आरोग्याच्या खांद्यावर निवडणुकीचा भार!

अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे या निवडणूक विभागाचा भार सक्षमपणे पेलत असताना अचानक या विभागाची जबाबदारी आरेाग्य विभाग आणि पर्यायाने कोविडची महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

80

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग कामाला लागले असून महापालिकेतही आता अधिकाऱ्यांच्या निवडणूक कामांच्या आढाव्यासंदर्भात बैठका वाढू लागल्या आहे. मात्र, आजवर या विभागाची जबाबदारी सक्षम असलेल्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे होती. परंतु आता ही जबाबदारी त्यांच्याकडून काढून अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सुरेश काकाणी यांच्याकडे आधीच आरोग्य विभागाची महत्वाची जबाबदारी आहे. त्याअंतर्गत कोविड विरोधातील लढाई ते लढत आहे. असे असतानाच आता निवडणुकीचाही भार त्यांच्यावर सोपवून आयुक्तांनी अन्य अतिरिक्त आयुक्तांवर अविश्वास दर्शवला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नियुक्त झालेल्या संजीव कुमार यांच्याकडे निवडणूक विभागाची जबाबदारी देता आली असती. कारण निवडणूक विभागाचे काम आतापासूनच सुरु असून संजीव कुमार हे नवखे असल्याने त्यांना या विभागाची जबाबदारी पार पाडण्यात कोणत्याही अडचणी आल्या नसत्या, असे बोलले जात आहे.

अश्विनी भिडे सक्षम असतानाही निर्णय बदलला!

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक विभागाने राज्य निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार कामाला सुरुवात केली आहे. यापूर्वी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु.पी.एस. मदान यांच्यासोबत बैठक घेवून महापालिकेला प्राप्त झालेल्या सूचनेनुसार विभागाला काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उपायुक्त सुनील धामणे आणि उपायुक्त संगीता हसनाळे यांची टिम कामाला लागलेली आहे. मात्र, निवडणूक विभागाच्या कामाला सुरुवात झालेली असतानाच महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी या विभागाचा कर्णधारच बदलून टाकला आहे. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे या निवडणूक विभागाचा भार सक्षमपणे पेलत असताना अचानक या विभागाची जबाबदारी आरेाग्य विभाग आणि पर्यायाने कोविडची महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. काकाणी यांचा महसूल विभागाचा पुर्वानुभव पाहता ही जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जाते. हा भार सोपवतानाच काकाणी यांच्याकडील मुंबई अग्निशमन दल आणि सहआयुक्त आशुतोष सलिल यांच्याकडील शिक्षण विभागाची जबाबदारी भिडे यांच्याकडे सोपवण्यात आली.

(हेही वाचा : कालिदास कोळंबकरांचे ‘ते’ स्वप्न आज पुन्हा पूर्ण झालंच)

भिडेंवरील अविश्वास कायम!

कोविडचे थैमान सुरु झाल्यानंतर अविरत सेवा देणाऱ्या काकाणी यांच्याकडील काही विभाग तथा खात्यांचा भार कमी करून तो  तत्कालिन  अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे  दिला जावा, अशी मागणी आयुक्तांकडे वारंवार होत होती. परंतु आयुक्तांना जयस्वाल यांच्याकडे काकाणी यांच्याकडील विभाग देण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे जयस्वाल यांना महापालिकेत मनासारखे काम करता येत नसल्याने ते निराश होते. त्यातच त्यांची बदली करून त्यांच्या जागी नागपूरमधील संजीव कुमार यांना आणण्यात आले. संजीव कुमार यांना महापालिकेसह मुंबईतील भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान नसल्याने सध्या त्यांच्याकडे असलेल्या सर्व विभागांचा आढावा घेण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे निवडणूक विभागाची जबाबदारी ही काकाणी यांच्याकडे न देता संजीव कुमार यांच्यावर सोपवता आली असती. पण प्रशासनाने आधीच प्रामाणिकपणे आणि सचोटीने काम करणाऱ्या तथा आरोग्य विभागाच्या बोजाखाली काम करणाऱ्या काकाणी यांच्यावर आता निवडणूक विभागाचा भार लादला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या भीतीखातर पदांची अदलाबदल झाल्याचे समजते. अश्विनी भिडे यांनी एक सनदी अधिकारी म्हणूनच प्रामाणिकपणे काम करत शिवसेनेचे स्वप्न असलेल्या कोस्टल रोडच्या कामाला गती देत, नाराज असलेल्या शिवसेनेची मने जिंकली. तरीही त्यांच्या मनातील अविश्वास कायमच आहे. भिडे यांच्याकडे निवडणूक  विभाग असल्यास भाजपला मदत होवू शकते, या अविश्वासापोटी या विभागाचा भार त्यांच्याकडून काढून  घेण्यात आला आहे. तर संजीव कुमार यांचे नागपूर कनेक्शन पाहता त्यांच्याकडेही या विभागाचा भार सोपवणे सेनेला  भीतीचे वाटत  आहे. त्यामुळेच  आयुक्तांनी आपल्या मर्जीतील असलेल्या आणि कोणत्याही राजकीय दबावाखाली काम न करता दिलेली जबाबदारी जोखपणे पार पाडणाऱ्या काकाणी यांच्यावर सोपवल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.