चांदिवलीत हिरानंदानी शेजारी प्रकल्पबाधितांसाठी महापालिका बांधणार ४ हजार सदनिका

टीडीआरचा लाभ देवूनही चांदिवलीत प्रत्येक सदनिकेसाठी ३९ लाख ६० हजार रुपये विकासकाला मोजले जाणार आहे.

142

मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी विकासकांकडून मागवण्यात आलेल्या स्वारस्य अर्जांना आता प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार चांदिवलीमध्ये एसआरए प्रकल्पांतील विक्रीच्या इमारतींच्या भूखंडावर ४ हजार, तर बोरीवलीतील एक्सरमध्ये १०० प्रकल्पबाधितांसाठी सदनिका बांधण्यात येणार आहे. विकास हस्तांतरणीय जमीन, विकास हस्तांतरणीय क्षेत्र, बांधकाम विकास हस्तांतरणीय क्षेत्र यांच्या बदल्यात विकासकांकडून या सदनिका बांधून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सर्व टीडीआरचा लाभ देवूनही चांदिवलीत प्रत्येक सदनिकेसाठी ३९ लाख ६० हजार रुपये विकासकाला मोजले जाणार आहे. त्यामुळे प्रकल्प बाधितांसाठीच्या या सदनिकांची किंमत अधिक मोजावी लागणार असून महापालिकेचे प्रकल्प साकारण्यासाठी त्यातील अडथळा ठरणाऱ्या बांधकामे आणि कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

दोनदा जाहिराती देऊनही २ निविदा प्राप्त 

मुंबईतील अनेक पायाभूत प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी त्यामध्ये बाधित होणाऱ्या बांधकामे तोडून त्यातील पात्र कुटुंबांचे तथा गाळेधारकांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यामुळे यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर भार न लादता सदनिका बांधून घेण्यासाठी जमिनीचे विकास हस्तांतरणीय क्षेत्र तसेच बांधकामाचे विकास हस्तांतरणीय क्षेत्र देवून खासगी जमीन मालक तथा विकासक यांच्याकडून स्वारस्यांच्या अभिव्यक्ती प्रथमत: मागवण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोनदा जाहिरात देवूनही तीन परिमंडळांमध्ये केवळ दोनच निविदा प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये विकासकांनी या टीडीआर शिवाय अतिरिक्त अधिमुल्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेने यामध्ये बदल करत एमएमआरडीएच्या धर्तीवर या निविदा मागवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चांदिवली गावातील पीपीएस अर्थात पवार पब्लिक स्कूल शेजारी असलेल्या नगर भू क्रमांक ११ ए /५/ ३ या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील विक्री भूखंड देवू केलेला आाहे. हा भूखंड हिरानंदानी कॉम्प्लेक्सलगत आहे. यावर ४ हजार प्रकल्पबाधितांसाठी सदनिका बांधून देण्यासाठी डी.बी.एस. रियल्टी हे विकासक पात्र ठरणार आहे. त्यांनी ४ हजार सदनिकांसाठी जमीन विकास हस्तांतरणीय क्षेत्र, बांधकाम विकास हस्तांतरणी क्षेत्र याशिवाय प्रति सदनिका ३९ लाख ६० हजार रुपये अधिमुल्य आकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे या टीडीआर हा जमीन अधिक बांधकामाचा असणार असून अधिमुल्याची रक्कम क्रेडिट नोटच्या रुपाने दिली जाणार आहे. यासाठी १५८४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

(हेही वाचा : भाजपाचा चक्क काँग्रेसला पाठिंबा!)

एक्सरमध्ये १०० सदनिका

याच प्रकारे बोरीवली एक्सर गावामधील दहिसर पश्चिमेला असलेल्या आय.सी.कॉलनी या विकसित भागातील नगर भू क्रमांक १२७१ जे या भूखंडावरील ९६० चौरस मीटरच्या जागेवर १०८ सदनिका बांधून देण्याचा प्रस्ताव आहे. या जागेवर सदनिका बांधून देण्यासाठी मेसर्स एम.बी.इन्फ्रोप्रोजेक्ट या विकासकाने प्रस्ताव दिला असून टीडीआरशिवाय प्रत्येक सदनिकेसाठी  २९ लाख ७० हजार रुपये एवढी रक्कम अधिमुल्याच्या स्वरुपात देण्यात येणार आहे. त्यामुळे टीडीआर बरोबरच सदनिकांच्या अधिमुल्यासाठी निश्चित  केलेली रक्कम ही क्रेडिट नोटच्या रुपाने विकासकाला दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आता सुधार समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून समिती यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.