महापालिकेने किती खरेदी केले लिक्विड सिलिंडर? वाचा…

एका सिलिंडरसाठी २ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा दर देवू केला असून ११० सिलिंडरसाठी विविध करांसह २ कोटी ९२ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या जंबो कोविड सेंटरसह विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत असले तरी आणीबाणीच्या प्रसंगी लिक्विड सिलिंडरचीही गरज लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने २०० लिटर क्षमतेचे मायक्रो पोर्टेबल लिक्विड सिलिंडरची खरेदी करण्यात येत आहे. तब्बल ११० सिलिंडरची खरेदी केली जात आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन पाईप्ड लिक्विड गॅससह सिलिंडर गॅसचाही साठा करत सज्ज होत आहे.

२०० लिटर क्षमतेच्या मायक्रो पोर्टेबल लिक्विड सिलिंडरची मागणी

मुंबईत कोविड १९च्या आजाराचा कहर झालेला असून बाधित रुग्ण मोठ्याप्रमाणात महापालिका रुग्णालयात तसेच जंबो कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. या रोगाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना मायक्रो पोर्टेबल लिक्विड सिलिंडरचा उपयोग होतो. सध्या महापालिका रुग्णालयांत व जंबो कोविड सेंटर्समध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी २०० लिटर क्षमतेच्या मायक्रो पोर्टेबल लिक्विड सिलिंडरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

(हेही वाचा : नगरसेवकांना पडला प्रश्न, कुणासमोर फोडायचे डोकं?)

२ कोटी ९२ लाख रुपयांचा खर्च

यासाठी मुंबई महापालिकेने या सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. यामध्ये सतरामदास गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही एकमेव कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीने आवश्यक असलेले ११० सिलिंडरचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. या सिलिंडरच्या खरेदीमध्ये एका सिलिंडरसाठी २ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा दर देवू केला असून या ११० सिलिंडरसाठी विविध करांसह २ कोटी ९२ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर दोन दिवसांमध्ये या सर्व सिलिंडरचा पुरवठा केला जाईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here