मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी टॅब वाटप करण्याची योजना सपशेल फेल ठरल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून आता विभागातील गरीब मुलांना या टॅबचे वाटप करत निवडणुकीपुरते त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे विभागातील गरजवंत शाळकरी मुलांना टॅब वाटण्याची मोहीम शिवसेनेच्याच नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये सुरु होणार आहे. महापालिका नियोजन विभागाच्या माध्यमातून टॅब उपलब्ध करून दिले जाणार असून हे केवळ शिवसेनेच्या नगरसेवकांसाठीच असून भाजप नगरसेवकांना हे टॅब उपलब्ध करून दिले जाणार नाही. त्यामुळे गरजवंत विद्यार्थी शिवसेना नगरसेवकांच्याच प्रभागात असून भाजपच्या प्रभागात श्रीमंत वर्गातील मुले असल्याने त्यांना टॅबची गरज नाही, असेच महापालिका प्रशासनाचे म्हणणे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजपच्या नगरसेवकांमध्ये नाराजी
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत अर्थसंकल्प मंजूर करताना, त्यामध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यामध्ये शाळकरी मुलांसाठी टॅबसह फुड ट्रक, शिवण यंत्र, ज्यूट पिशव्या आदींच्या समावेश करण्यात आला आहे. या सर्व वस्तूंच्या वाटपांकरता अर्ज मागवण्यात आलेल्या अर्जदारांची पात्रता निश्चित करण्याचे काम सध्या नियोजन विभागामार्फत केले जात आहे. त्यामुळे पात्र अर्जदारांना टॅबसह इतर वस्तूंचे वाटप केले जात असून यासाठी प्रत्येक प्रभागांमध्ये नगरसेवकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनाच या निधीतून वस्तू प्राप्त होणार असल्याने भाजपच्या नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.
महापालिकेकडून भेदभाव
प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्थायी समितीने शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना टॅबसह इतर वस्तूंच्या वाटपासाठी विशेष निधीची तरतूद केली आहे, त्यातून या वस्तूंचे वाटप होणार आहे. तर भाजपच्या घाटकोपरमधील नगरसेविका बिंदू त्रिवेदी यांनी आधीच निधी वाटपात असमानता आणि त्यानंतर आता शिवसेनेच्याच नगरसवेकांच्या प्रभागांमध्ये टॅबचे वाटप केले जात असेल, तर ते योग्य नाही. म्हणजे गरजवंत विद्यार्थी हे शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात आहेत आणि भाजपच्या नाहीत का, असा सवाल त्रिवेदी यांनी करत हे एक प्रकारे इतर प्रभागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ असल्याचे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community