क्लीन अप मार्शलच्या नाड्या महापालिका आवळणार, घेणार ‘हा’ निर्णय

संपूर्ण २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत विना मास्क वावरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

86

मुंबईतील कोविड प्रतिबंधक नियमांनुसार विना मास्क विरोधी कारवाई करण्यासाठी महापालिकेच्यावतीने नेमलेल्या क्लीन अप मार्शलकडून जनतेची लूट केली जात असल्याने अखेर प्रशासनानेही कडक निर्णय घेतला आहे. महापालिकेच्यावतीने नेमण्यात आलेल्या २४ विभागांमधील संस्थांविरोधात लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्याविरोधात पोलिस एफआयआर दाखल करून त्यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे. शिवाय सर्वच संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना स्पष्टीकरण तसेच प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पोलिस ठाण्यातून चारित्र्य प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. त्यामुळे ज्या संस्था यानुसार अंमलबजावणी करणार नाही, त्यांची कायमचीच हकालपट्टी करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला असून सोमवारी याबाबत झाडाझडती घेतली जाणार आहे.

मुंबईत कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे. कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीकोनातून आणि जनतेला शिस्त लावण्यासाठी मुंबईत क्लीन अप मार्शल योजनेतंर्गत मार्शलवर विना मास्कविरोधी कारवाई करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

(हेही वाचा : खड्ड्यांचे प्रदर्शन नाही तर जनतेचा आवाज! आशिष शेलारांचा सत्ताधाऱ्यांना टोला)

समज देऊनही क्लीन अप मार्शलवर परिणाम झाला नाही!

मुंबई महानगरपालिकेने कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार व प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता मार्च २०२० पासून विविध उपाययोजना वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी अमलात आणलेल्या आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. तसेच संपूर्ण २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत विना मास्क वावरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबईतील काही क्लीन अप मार्शल हे प्रसारमाध्यम प्रतिनिधी व नागरिक यांच्याशी गैरवर्तणूक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर १७ जुलै २०२१ रोजी महापौरांनी घनकचरा खात्याचे संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि क्लीन अप मार्शल यांची आढावा बैठक घेत त्यांना समज दिली होती. परंतु त्यानंतरही क्लीन अप मार्शलच्या वर्तणुकीत कोणताही बदल झालेला नाही.

क्लीन अप मार्शलच्या तक्रारींमध्ये अधिकच वाढ होऊ लागली!

उलट कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यासाठी लागू करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सर्व अतिरिक्त आयुक्त व अधिकाऱ्यांसोबत केलेल्या बैठकीत क्लीन अप मार्शलची कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले होते. पण त्यानंतर क्लीन अप मार्शलच्या तक्रारींमध्ये अधिकच वाढ होऊ लागली असून महापालिकेने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत एकप्रकारे जनतेला शिस्त लावण्याऐवजी त्यांची लूटच करत असल्याचे प्रकार समोर येत आहे. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ज्या ज्या संस्थांबाबत लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यांच्याविरोधात पोलिस एफआयआर दाखल करून त्यांना बाजुला केले जाईल. तसेच उर्वरीत सर्व क्लीन अप मार्शलच्या संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांनी आपल्याकडे नियुक्त असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पोलिस ठाण्यातून चारित्र्य प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. ज्या ज्या संस्था या महापालिकेच्या निर्देशांचे पालन करतील, त्यांच्या मदतीने पुढील काम सुरु ठेवले जाईल आणि ज्या संस्था आपल्याकडील कर्मचाऱ्यांची पोलिस प्रमाणपत्र देवू शकणार नाही त्यांना बाजुला केले जाईल. यासंदर्भात सोमवारी बैठक घेवून या सूचना केल्या जाणार असून जर संस्थांचा कालावधी संपुष्टात आला असेल तर नवीन संस्थांची निवड करण्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकांना शिस्त लागावी याकरता ही मोहिम रावबली जात आहे, ना की दंड आकारुन महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी. त्यामुळे जनतेने मास्क लावून जर सहकार्य केल्यास क्लीन अप मार्शलसोबत हुज्जत घालण्याचीही वेळ येणार नाही. त्यामुळे जनतेने कोविडच्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीकोनातून मास्क लावूनच सार्वजनिक ठिकाणी व कार्यालयाच्या ठिकाणी वावरावे, असेही आवाहन त्यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.