भाजपचा आवाज शिवसेना करणार ‘म्यूट’

मुंबई महापालिकेसह सर्वच महापालिकांच्या समित्यांचे कामकाज प्रत्यक्ष ऐवजी पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे ऑनलाईन घेण्याचे निर्देश नगरविकास खात्याने जारी केले आहेत. परंतु यापूर्वी प्रत्यक्ष सभा न घेण्यामागे भाजपचा आक्रमकपणाच जबाबदार होता आणि भाजपला न्यायालयात दाद मागवून या सभा प्रत्यक्ष घेण्यास भाग पाडावे लागले. मात्र त्यानंतर भाजपच्या आक्रमतेपुढे शिवसेनेला सत्ता चालवताना कठिण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहेत. परंतु आता सरकारने पुन्हा एकदा ऑनलाईन सभा घेण्याचे जाहीर करत एक प्रकारे भाजपच्या आक्रमकपणाची हवाच काढली आहे. त्यामुळे एरव्ही सभांमध्ये आवाज करत शिवसेनेला जेरीस आणणाऱ्या भाजपच्या सदस्यांचा आवाज म्यूट करण्याचे बटनच अध्यक्षांच्या हाती असल्याने भाजपच्या नगरसेवकांच्या आवाजाची हवाच काढली जाणार आहे.

( हेही वाचा : कॉर्डिलिया क्रूझ या कारणामुळे पुन्हा चर्चेत! )

पुन्हा एकदा ऑनलाईन सभा

कोविडच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या समित्यांच्या सभा ऑनलाईन सुरु करण्यात आल्यानंतर ऑक्टोबर २०२१ पासून पुन्हा स्थायी समितीच्या सभा प्रत्यक्ष घेण्यास सुरुवात केली. परंतु त्यानंतर विविध समित्यांसह महापालिका सभाही प्रत्यक्षात घेण्यास सुरुवात झालेली असतानाच वाढत्या कोविड आणि ओमायक्रॉनच्या बाधित रुग्णांमुळे पुन्हा एकदा ऑनलाईन सभा घेण्याचे निर्देश नगरविकास खात्याने जारी केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या सभा तसेच समित्यांच्या सभा या ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपच्या आक्रमतेची धार आता बोथट होण्याची शक्यता आहे. भाजप आक्रमक होईल याच भीतीने यापूर्वी महापालिकेच्या समित्यांच्या सभा प्रत्यक्ष घेतल्या जात नव्हत्या. पण पुन्हा जेव्हा प्रत्यक्ष सभा घेतल्यानंतर भाजपने आपला आक्रमकपणा दाखवून दिला होता, एवढेच नव्हेतर महापालिकेच्या दुसऱ्याच प्रत्यक्ष सभेत शिवसेना आणि भाजप एकमेकांसमोर ठाकली गेली आणि दोघांनाही पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवावा लागला होता. त्यामुळे महापालिका सभेच्या वेळेला महापौर निवासाबाहेर पोलिसांना सज्ज ठेवले जात असल्याने एकप्रकारे छावणीचे स्वरुपत भायखळा येथील रस्त्यांवर दिसून येते.

बैठका प्रत्यक्ष घ्या

दरम्यान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ऑनलाईन सभांच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. महानगरपालिका सदनाच्या बैठका ऑनलाईन न घेता सोशल डिस्टंसिंग व कोविड संबंधित सर्व बंधने पाळून सभागृहात प्रत्यक्ष घेण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व महापालिका आयुक्तांकडे केली आहे. ज्या प्रमाणे सद्यस्थितीत शहरामध्ये १० वी व १२ वी चे वर्ग सुरु आहेत. रेल्वे सेवा सुरु आहेत. कार्यालये सुरु आहेत. मुंबई महानगरपालिका सदन हे असे ठिकाण आहे, जेथे शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होते. नगरसेवकांना आपापल्या विभागातील प्रश्न उपस्थित करून, त्यावर चर्चा करता येते. पण व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा ऑनलाईन पद्धतीने बैठक घेतल्यास नगरसेवकांना प्रभावीपणे आपली बाजू मांडता येत नाही, म्हणून मुंबई महानगरपालिका सदनाच्या सर्व बैठका ऑनलाईन न घेता कोरोना संदर्भात शासनाचे सर्व नियम पाळून प्रत्यक्षात घेण्यात याव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here