मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांची गाडी सुसाट पळणार आहे. मागील काही काळांपासून यांचा वेग मंदावला होता. परंतु आता त्यांचे इंजिनच पॉवरफुल केले जाणार आहे. ज्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये सर्व सहायक आयुक्तांची गाडी सुसाट पळून महापालिकेच्या विकासकामांनाही गती प्राप्त झालेली पहायला मिळणार आहे.
नवीन २४ स्कॉर्पिओ गाड्या खरेदी होणार
मुंबई महापालिकेच्या २४ विभागीय सहायक आयुक्तांच्या सेवेमध्ये असलेल्या स्कॉर्पिओ गाड्या जुन्या झाल्या असून वारंवार यामध्ये बिघाड होत आहे. त्यामुळे सहायक आयुक्तांना विभागात फिरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रसंगी बैठकीला किंवा अन्य सभांना वेळेवर उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे आता त्यांच्यासाठी जुन्या स्कॉर्पिओ वाहनांच्या जागी नवीन २४ स्कॉर्पिओ गाड्या खरेदी केल्या जात आहेत. यासाठी स्कॉर्पिंओ बीएस-सहा(एस-५) या मॉडेलची वाहने महिंद्रा आणि महिंद्रा लिमिटेड कंपनीकडून खरेदी केली जात आहे. बाजारात या वाहनाची किंमत १३ लाख ०७ हजार एवढी असून या कंपनी महापालिकेला ११ लाख ३४ हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे या २४ वाहनांच्या खरेदीसाठी २.८३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर या वाहनांच्या खरेदीची प्रक्रिया राबवून पुढील तीन महिन्यांमध्ये ही वाहने सहायक आयुक्तांच्या सेवेत दाखल होती, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community