मुंबई महापालिकेच्या स्थापत्य (शहर) समितीच्या बैठकीत मंजूर केलेल्या विविध संवर्गातील १०५ सहायक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर तसेच २७ कार्यकारी अभियंत्यांना उपप्रमुख अभियंत्यापदावर पदोन्नती देण्याचा प्रस्ताव सभागृहाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या अभियंत्यांना सत्ताधारी पक्ष हा हक्काच्या पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष या अभियंत्यांना कोविड योध्दा समजत असतील, तर त्यांनी त्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव त्वरीत मंजूर करावा, अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. परंतु हा प्रस्ताव मंजूर करण्यास विलंब होत असल्याने या अभियंत्यांच्या होणाऱ्या नुकसानीस आणि यामुळे त्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाला सत्ताधारी पक्ष जबाबदार असेल, असा इशाराही साटम यांनी दिला आहे.
‘तो’ प्रस्ताव स्थापत्य शहर समितीत मंजूर!
महापालिकेच्या विविध संवर्गातील १०५ सहायक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्याचा आणि विविध संवर्गातील २७ कार्यकारी अभियंत्यांना उपप्रमुख अभियंतापदावर पदोन्नती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य शहर समितीत मागील आठवड्यात मंजूर करण्यात आला. त्यानंतर प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यासाठी महापालिका सभागृहासमोर तातडीचे कामकाज म्हणून मांडण्यात आला होता. परंतु आजतागायत दोनवेळा महापालिका सभागृह बोलावून ते रद्द करण्यात आले. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर न होण्यामागे मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता वर्तवली जात असून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील काही नेते मिळून अभियंत्यांना त्यांच्या हक्काच्या बढती तथा पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला.
(हेही वाचा : ब्रिटिशकालीन कायदे कायम असणे राष्ट्रासाठी घातक! अधिवक्ता अंकुर शर्मांचे मत)
अभियंत्यांनी कोविड सेंटरची उभारणी केल्यामुळे कोरोना नियंत्रणात
कोविड काळात या सर्व अभियंत्यांनी जीव धोक्यात घालून काम केले आहे. कोविड सेंटरची उभारणी असो किंवा इतर कोविडच्या उपाययोजनांची अंमलबजावणी असो…अभियंते रस्त्यांवर उतरून काम करत होते. प्रसंगी अनेक अभियंत्यांना जीव गमवावे लागले. शिरीष दीक्षित, अशोक खैरनार आदी अभियंते अधिकारी यांचे जीव गेले आहेत. आज त्यांनी केलेल्या कामांमुळे सत्ताधारी पक्ष बक्षीस आणि मेडल तथा पुरस्कार मिळवत आहेत. मुंबईत कोरोना नियंत्रणात आणले असे जे काही चित्र निर्माण केले जाते, ते याच अभियंत्यांनी कोविड सेंटरची उभारणी केल्यामुळे याचीही आठवण साटम यांनी महापौर आणि पर्यायाने सत्ताधारी पक्षाला करून दिली आहे.
सत्ताधारी पक्ष या अभियंत्यांना पदोन्नतीपासून डावलत आहे!
या अभियंत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांचा गौरव करण्याऐवजी त्यांना पदोन्नती तथा बढतीपासून रोखून एकप्रकारे अपमानित केले जात आहे. त्यांना दुर्लक्षित केले जात आहे. त्यामुळे महापालिका सभागृह तातडीने बोलावून या अभियंत्यांना त्यांचा हक्क दिला जावा. त्यांना त्यांच्या पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा कोणताही अधिकार सत्ताधारी पक्षाला नसून जर ते या अभियंत्यांना कोविड योध्दा समजत असतील तर ते येत्या तीन दिवसांत हा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा सत्ताधारी पक्ष या अभियंत्यांना पदोन्नतीपासून डावलत आहेत हे स्पष्ट होईल. त्यामुळे अभियंत्यांच्या होणाऱ्या नुकसानीस आणि यामुळे त्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाला सत्ताधारी पक्ष जबाबदार असेल, असाही इशारा साटम यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community