मुंबई महापालिकेकडून राणेंना पुन्हा नोटीस! काय आहे प्रकरण?

112

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूतील अधिश बंगल्याच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याचे नमूद करत ३५१ (१) ची नोटीस बजावण्यात आली आहे.

अशी आहे नोटीस

नोटीसमध्ये म्हटले आहे की, या नोटिसीला समाधानकारक उत्तर देण्यास सात दिवसांची मुदत दिली असून बंगल्यात केलेले बदल मंजूर केलेल्या आराखड्यानुसार असल्याचे सिद्ध करण्यास सांगितले आहे. सात दिवसानंतर महापालिका स्वत: अनधिकृत बांधकाम तोडून त्याचा खर्चही वसूल करेल.

(हेही वाचा- नवाब मलिक गर्दुल्ले आहेत! मोहित कंबोजांनी दाव्यासह केला आरोप)

काय आहे प्रकरण

याआधी २१ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या के पश्चिम विभागाच्या पथकाने बंगल्यात जाऊन तपासणी केली होती. त्यावेळी अधिकाऱ्र्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून राणेंना काही विचारपूस केली होती. त्यानंतर आता बंगल्यावर अनधिकृतपणे बांधकाम केल्याचा ठपका ठेवत पुन्हा ही नोटीस बजावण्यात आली आहे. सर्वच मजल्यांवर चेंज ऑफ यूझ झाले असून बहुतांश ठिकाणी गार्डनच्या जागी रूम बांधल्याचा नोटिशीत उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान राणेंनी आपण कोणत्याच नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे सांगितले होते.

सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन

चार वर्षांपूर्वी तक्रार करूनही बंगल्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करत नसल्याची आठवण माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी महापालिकेला करून दिली. त्यानंतर महापालिकेने राणेंना नोटीस पाठवली. अधिश बंगला गेल्या काही वर्षांपासून वादात आहे. सीआरझेडचे नियम धाब्यावर बसवून बंगल्याचे बांधकाम झाल्याचे दौंडकर यांनी सांगितले. हा बंगला समुद्र किनाऱ्यापासून ५० मीटरवर आहे. त्यामुळे सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दौंडकर यांनी म्हटले आहे.

…तर कारवाई होणार

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंगल्याच्या तपासणीनंतर अनधिकृत बांधकामे आढळून आल्यास आणखी एक नोटीस बजावली जाईल. बंगल्याची वैधता दाखवून देण्यासाठी त्यांना ठराविक वेळ देण्यात येईल. कायदेशीर कागदपत्रे दाखवण्यात अपयशी ठरल्यास पाडकामाची कारवाई करण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.