महापालिकेत पीआर एजन्सीची नियुक्ती: भाजपाने केला विरोध

कोविडमुळे महापालिका आर्थिक डबघाईला आलेली असताना हा खर्च महापालिकेवरील आर्थिक भुर्दंडच आहे.

142

मुंबई महापालिकेचा स्वतंत्र जनसंपर्क विभाग असतानाही त्यांनी आता सोशल मीडियाद्वारे महापालिकेची प्रतिमा उजळून टाकण्यासाठी खासगी पीआर एजन्सीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या खासगी पीआर एजन्सीच्या नियुक्तीसाठी निविदा मागवण्यात येत असून, याला भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी तीव्र विरोध केला आहे. या नवीन नियुक्तीमुळे महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार असून, या उधळपट्टीला आपला विरोध असल्याचे गंगाधरे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः रस्त्यांच्या निविदांवरुन भाजपा-शिवसेना भिडले)

महापालिकेवर आर्थिक भुर्दंड

मुंबई महापालिकेची प्रतिमा चांगली राखण्यासाठी महापालिकेचा स्वत:चा जनसंपर्क विभाग असूनही, आता महापालिकेने सोशल मीडियावर चांगली प्रतिष्ठा राखण्यासाठी दुसऱ्या पीआर एजन्सीची निविदा आमंत्रित केली आहे. यासाठी एक जाहिरात देखील प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच संस्थेत किती पीआर एजन्सी नेमल्या जाणार? काही वर्षांपूर्वी अजोय मेहता यांनी आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर आपले माध्यम सल्लागार म्हणून राम दोतोंडे यांची नेमणूक केली होती, ते आजही कार्यरत आहेत. जरी त्यांची मदत होत नसली तरी त्यांचे मासिक मानधन आणि भत्ते चालू आहेत. याशिवाय निवासस्थान, कार्यालय व मनुष्यबळाचा खर्च वेगळाच. पण आता नवीन पीआर एजन्सीवर एक ते दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कोविडमुळे महापालिका आर्थिक डबघाईला आलेली असताना हा खर्च महापालिकेवरील आर्थिक भुर्दंडच आहे.

(हेही वाचाः नालेसफाईची कंत्राटे मान्य, पण रस्ते विकास कामांची अमान्य: एकाच अतिरिक्त आयुक्तांकडून असे का घडते?)

महापालिका, नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या सकारात्मक बातम्या सर्व माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असतानाही केवळ सत्ताधारी पक्षाच्या बातम्याच दिल्या जातात. त्यामुळे ठराविक बाबींसाठी हा खर्च करणे म्हणजे महापालिकेच्या तिजोरीवरील मोठा भार असल्याचे गंगाधरे यांनी म्हटले आहे.

भाजपाची नेमकी भूमिका काय?

भाजपाने याला विरोध केला असला तरी यापूर्वी याबाबत महापालिकेने मागवलेल्या निविदांना भाजपाचे महापालिका पक्षनेते विनोद मिश्रा यांनी विरोध करत फेरनिविदा मागवण्याची मागणी केली होती. त्यामुळे भाजपाच्या एका नगरसेवकाने फेरनिविदा मागवण्याची मागणी करायची आणि दुसरीकडे त्यांच्या सूचनेनुसार फेरनिविदा मागवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला दुसऱ्या नगरसेवकाने विरोध करायचा, यामुळे भाजपाची नेमकी भूमिका काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

(हेही वाचाः मालाडच्या ‘त्या’ रस्त्यावरील वाहनांची वाढणार गती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.