नारायण राणेंचा ‘तो’ बंगला वादात! मुंबई महापालिकेची पुन्हा नोटीस

133

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १५ फेब्रुवारी रोजी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर जोरादर निशाणा साधला. संजय राऊत यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावर आरोप केले होते. भाजपकडून नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तरही देण्यात आले होते. त्यामुळे नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वादाची ठिणगी पुन्हा एकदा पेटणार असल्याचे संकेत दिसताय. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूतील बंगल्यात झालेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. महापालिकेचे पथक राणेंच्या बंगल्यात तपासणीसाठी जाणार असून अनधिकृत बांधकामाचे मोजमाप हे पथक करणार आहे.

ddddd

मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम वॉर्डकडून राणेंना मुंबई महापालिका कायदा, १८८८ च्या कलम ४८८ अंतर्गत नोटीस पाठवली आहे. यात म्हटले आहे की, जुहू तारा रोडवरील अधिश बंगल्याची पाहणी करण्यासाठी के-पश्चिम वॉर्डच्या इमारत प्रस्ताव विभागाचे पथक येईल. अनधिकृत बांधकामाची पडताळणी या पथकाकडून केली जाईल. बंगल्याच्या बांधकामासाठीची कागदपत्रे तयार ठेवण्यासंदर्भात नोटीस पाठवली गेल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

(हेही वाचा – दिलासा! येत्या दोन दिवसात चित्रपटगृह, हॉटेल्स पूर्ण क्षमतेने होणार सुरू?)

सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन

चार वर्षांपूर्वी तक्रार करूनही बंगल्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करत नसल्याची आठवण माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी महापालिकेला करून दिली. त्यानंतर महापालिकेने राणेंना नोटीस पाठवली. अधिश बंगला गेल्या काही वर्षांपासून वादात आहे. सीआरझेडचे नियम धाब्यावर बसवून बंगल्याचे बांधकाम झाल्याचे दौंडकर यांनी सांगितले. हा बंगला समुद्र किनाऱ्यापासून ५० मीटरवर आहे. त्यामुळे सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दौंडकर यांनी म्हटले आहे.

…तर कारवाई होणार

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंगल्याच्या तपासणीनंतर अनधिकृत बांधकामे आढळून आल्यास आणखी एक नोटीस बजावली जाईल. बंगल्याची वैधता दाखवून देण्यासाठी त्यांना ठराविक वेळ देण्यात येईल. कायदेशीर कागदपत्रे दाखवण्यात अपयशी ठरल्यास पाडकामाची कारवाई करण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.