मागील वर्षी मार्च महिन्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर, महापालिकेच्या स्थायी समितीसह सर्व समित्यांच्या बैठकांचे कामकाज ऑनलाइन करण्यात येत होते. मात्र, कोविडचा भार कमी झाल्यानंतर २१ ऑक्टोबरपासून ते पुन्हा पूर्ववत करण्यात आले. पण पुन्हा एकदा कोविड रुग्णांची संख्या वाढू लागल्याने या सर्व समित्यांच्या बैठकांचे कामकाज ऑनलाइन करण्यात येत असून, गुरुवारी होणारी स्थायी समितीची बैठक ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.
गुरुवारी होणार ऑनलाइन सभा
शासनाच्या आदेशानुसार, स्थायी समितीसह इतर वैधानिक व विशेष समित्यांच्या बैठकांचे कामकाज हे ऑनलाइन करण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्यात कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर २१ तारखेपासून महापालिका सभागृहात प्रत्यक्ष सभा घेण्यास आयुक्तांनी मान्यता दिली होती. तेव्हापासून महापालिका सभागृह वगळता इतर सर्व वैधानिक व विशेष समित्यांचे कामकाज हे प्रत्यक्षरित्या सुरू झाले होते. पण मार्च महिन्यापासून कोविड रग्णांचा भार अधिकच वाढल्याने, पुन्हा एकदा या सर्व समित्यांचे कामकाज ऑनलाइन करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार स्थायी समितीची गुरुवारी १५ एप्रिल रोजी होणारी सभा ऑनलाइनद्वारे होण्याची दाट शक्यता आहे. महापालिका आयुक्तांनी तशाप्रकारचे निर्देश जारी केले असून, त्यानुसार ही सभा घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचाः बाहेरगावी जाणा-यांना कोणतेही पास नाही… पोलिस महासंचालकांच्या स्पष्ट सूचना!)
का घेतला निर्णय?
मागील वेळेस ऑनलाइन सभांविरोधात भाजपने न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने प्रत्यक्ष सभा घ्याव्यात, असे निर्देश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने प्रत्यक्ष सभा घेण्यास परवानगी दिली. पण सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी १४४ कलम लागू केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोविडचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोनातून पुन्हा एकदा समित्यांच्या बैठकांचे कामकाज ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
(हेही वाचाः महापालिका मुख्यालयासह कार्यालयांमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी!)
हिंदुस्थान पोस्टने काही दिवसांपूर्वीच मुंबईतील सर्व समित्यांचे कामकाज हे ऑनलाइन करण्यात येणार असल्याचे वृत दिले होते. त्यानुसार पुन्हा एकदा महापालिकेच्या समित्यांचे कामकाज ऑनलाइन करण्याच्या दृष्टीकोनातून पाऊल पडू लागले आहे.
Join Our WhatsApp Community