दरड दुर्घटना: जिल्हाधिकारी, म्हाडा, पीडब्ल्यूडी अलिप्तच, महापालिकेवरच भार

दरड कोसळण्याची दुर्घटना घडली की तिन्ही प्राधिकरणे नामानिराळी राहून, महापालिकेच्या अंगावरच सर्व सोपवले जात आहे.

77

चेंबूर माहुल येथील वाशीनाका जवळील वांझार पाडामधील न्यू भारत नगर येथील झोपड्यांवर दरड कोसळून झालेल्या दुघर्टनेची मुख्य जबाबदारी कुणाची, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत. डोंगराळ भागांमध्ये वसलेल्या आणि दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या वस्त्यांशी मुंबई महापालिकेचा सुतराम संबंध नसून, या भागांमधील वस्त्यांची जबाबदारी जिल्हाधिकारी, म्हाडाचे झोपडपट्टी सुधार मंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची आहे. परंतु प्रत्यक्षात दुर्घटनेनंतर तिन्ही प्राधिकरणे जबाबदारी झटकून बाजूला झालेली असून, बंधनकारक कर्तव्य नसूनही तेथील कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारी महापालिकेच्या खांद्यावर येऊन पडली आहे. त्यामुळे तिन्ही प्राधिकरणे ही राज्य शासनाशी निगडीत असून राज्याचे मुख्यमंत्री मुंबई महापालिकेच्या माथी मारुन या प्राधिकरणाला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

महापालिकेने उचलली जबाबदारी

चेंबूर वाशीनाका येथील डोंगराळ भागात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असून, या भागात पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती व्यक्त करत येथील नागरिकांना सावधानता म्हणून स्थलांतरित होण्याची सूचना मुंबई महापालिकेच्या एम पूर्व विभागाने २ जून २०२१ रोजी दिली होती. त्यानंतर ही घटना घडून यामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले आहेत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबांना तसेच आसपासच्या घरांमधील सुमारे २५ कुटुंबांचे स्थलांतर महापालिकेने प्रकल्प बाधितांसाठी विष्णू नगर येथील इमारतींमधील सदनिकांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात केले. परंतु मदत कार्यापासून ते त्या कुटुंबांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाची जबाबदारी ही मुंबई महापालिकेने उचलली आहे.

(हेही वाचाः विक्रोळी, चेंबूर येथील दुर्घटनांना प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत! दरेकरांचा आरोप)

प्राधिकरणे राहतात नामानिराळी 

डोंगराळ भागात वसलेल्या वस्त्यांबाबतची पूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असते. डोंगराळ संरक्षक भिंत बांधण्याची जबाबदारी ही म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. डोंगराळ भागात ९ मीटरच्या खालील भिंत बांधण्याची जबाबदारी म्हाडाच्या झोपडपट्टी गलिच्छ वस्ती सुधार मंडळाची आहे. ९ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या संरक्षक भिंतीच्या उभारणीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. तर मुंबई महापालिका ही आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून त्यांची काळजी घेणे आणि त्यांना सूचित करणे एवढेच काम करत असते. परंतु एखादी दरड कोसळण्याची दुर्घटना घडली की तिन्ही प्राधिकरणे नामानिराळी राहून, महापालिकेच्या अंगावरच सर्व सोपवले जात आहे.

सदनिका मिळवून देण्यासाठी प्रयत्न

भारत नगरमधील रहिवाशांना स्थानिक शिवसेना नगरसेविका निधी शिंदे आणि त्यांच्या शिवसैनिकांसह इतर सामाजिक संस्था व पक्षातील कार्यकर्त्यांनी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. प्रारंभी शाळेमध्ये तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येत होती. परंतु रहिवाशांनी याला विरोध केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रशासनाला निर्णय बदलून विष्णू नगर येथील सदनिकांमध्ये तात्पुरत्या निवासाची जागा मिळवून देण्यास भाग पाडले. त्यानंतर एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी सदनिका उपलब्ध करुन दिल्या.

प्राधिकरणेच जबाबदार

जिल्हाधिका-यांनी पुढाकार घेऊन डोंगराळ भागातील वस्त्यांकडे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लक्ष देणे आवश्यक असतानाही त्यांच्याकडून ते दिले जात नाही. त्यामुळे भारत नगर येथील दरड दुर्घटनेला राज्य शासनाच्या अखत्यारित येणारी तिन्ही प्राधिकरणे जबाबदार असल्याचे या घटनेवरुन दिसून आले आहे. केवळ भारत नगरच नाही, तर विक्रोळी सुर्या नगर, कुर्ला संघर्ष नगर, कुर्ला कुरेशी नगर कसाईवाडा येथेही रविवारी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. विक्रोळीत १० जणांचा मृत्यू तर कुर्ल्यातील दोन्ही घटनांमध्ये पाच हून अधिक जण जखमी झाले आहे. परंतु या सर्व घटनांमध्ये तिन्ही प्राधिकरणे अलिप्तच राहिलेली पहायला मिळत आहेत.

(हेही वाचाः भररस्त्यात वकीलावर जीवघेणा हल्ला, कायदा सुवस्थेचे धिंडवडे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.