महापालिका प्रभागांची पुनर्रचना होणार, विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीवर आयोगाचे पत्र

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना करण्यात येणार असल्याची केवळ चर्चा होती, परंतु आयोगाच्या या पत्रामुळे प्रभागांच्या पुनर्रचनेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

88

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभागांची पुनर्रचना करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा असतानाच, आता राज्य निवडणूक आयोगाने याला अधिकृत दुजोरा दिला आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिध्द करू त्यावर हरकती व सूचना मागवण्यात येतील. या हरकती व सूचनांचा विचार करुन अंतिम प्रारुप रचना प्रसिध्द करण्यात येईल. त्यामुळे प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द केल्यानंतर विहित कालावधीत हरकती व सूचना नोंदवण्याचे राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांना पत्र लिहून कळवले आहे.

म्हणून केली होती पुनर्रचनेची मागणी

मुंबई महापालिका २०२२च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्याचे निर्देश महापालिकेला राज्य निवडणूक आयोगाने दिल्यानंतर विरेाधी पक्षनेते रवी राजा यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून, काही विशिष्ट ४५ प्रभागांच्या भौगोलिक रचनेमध्ये सुधारणा करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची सुरुवात करावी, अशी मागणी केली होती. यामध्ये राजा यांनी २०१७ मध्ये तत्कालीन राज्य शासनाने मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांची पुनर्रचना करताना आपल्या पदाचा गैरवापर केला व भाजपच्या सोयीप्रमाणे स्वत:च्या पक्षाला फायदा होण्यासाठी जाणीवपूर्वक चुकीच्या पध्दतीने पुनर्रचना केली. यामुळे भाजपला ४० ते ५० जागा जास्त मिळाल्या. ही बाब नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरुध्द होती, तेव्हा समाजातील काही व्यक्तींनी या पुनर्रचनांना विरोध करुनही त्यांना न्याय देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही बाब गंभीर असून सामान्य नागरिकांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे प्रभागांच्या पुनर्रचनेत सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली होती.

(हेही वाचाः प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षणावरून काँग्रेस-शिवसेनेत जुंपणार?)

भाजपचा न्यायालयात जाण्याचा इशारा

याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांच्या स्वाक्षरीने महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांना प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आल्यानंतर, हरकती व सूचना नोंदवण्यात याव्या, असे म्हटले आहे. भाजपने प्रभाग पुनर्रचनेला विरेाध दर्शवला असून, आयेागाने याबाबत पाऊल उचलल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना करण्यात येणार असल्याची केवळ चर्चा होती, परंतु आयोगाच्या या पत्रामुळे प्रभागांच्या पुनर्रचनेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

(हेही वाचाः प्रभागांच्या पुनर्रचनेविरोधात न्यायालयात जाऊ! भाजपचा इशारा)

३० जूनला स्पष्ट होणार निवडणूक कामांची दिशा

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयेागाने महापालिकेला कामाला लागण्याचे निर्देश दिले असले, तरी येत्या ३० जून रोजी राज्य निवडणूक आयोग आणि महापालिका निवडणूक विभाग यांच्यामध्ये बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये निवडणुकीचे अंतिम प्रारुप स्पष्ट होईल. या बैठकीमध्ये प्रभाग आरक्षण, प्रभागांची पुनर्र0चना, मतदार याद्यांमधील सुधारणा यांसह अन्य निवडणूक कामांच्या सूचना आयोगाकडून प्राप्त होणार आहेत. त्यामुळे सध्या महापालिका निवडणूक विभाग हा जुजबी काम करत असला, तरी ३० जूनच्या बैठकीनंतर त्यांना काम करण्याची दिशा स्पष्ट होईल.

(हेही वाचाः महापालिका निवडणूक बैठकीत काँग्रेसला पडला ‘राजा’चा विसर!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.