भाजप नेते किरीट सोमय्यांनंतर त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना देखील मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी 14 जूनपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन वाढवण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना अटकेपासून दिलासा मिळणार आहे. परंतु, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. यादरम्यान तपासअधिकारी जेव्हा बोलावतील तेव्हा चौकशीला हजर राहू अशी कबूली किरीट सोमय्या यांनी स्वत: उच्च न्यायालयात हजर असताना दिली. याची नोंद घेत न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी आपले आधीचेच निर्देश कायम ठेवत सुनावणी 14 जूनपर्यंत तहकूब केल्याचे सांगितले जात आहे.
INS Vikrant fraud case | Bombay High Court extends interim anticipatory bail relief to BJP leader Kirit Somaiya and his son Neil Somaiya till June 14
— ANI (@ANI) April 28, 2022
दरम्यान, गुरूवारी आयएनएस विक्रांत प्रकरणी उच्च न्यायालयात किरीट सोमय्यांसंदर्भात सुनावणी पार पडली. त्यानंतरची पुढील सुनावणी 14 जूनला होणार आहे. सरकारी वकीलाने न्यायालयाकडे तपासासाठी अधिकचा कालावधी मागितला आहे. या सुनावणीनंतर सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले सोमय्या?
ठाकरे सरकारने आरोप लावले आहे की, आपण 57 कोटींचा घोटाळा केला आहे. मात्र, त्यांनी न्यायालयात एकही पुरावा सादर केला नाही, असे किरीट सोमय्या म्हणाले. तसेच पुढे ते असेही म्हणाले, विक्रांत प्रकरणात 57 कोटी काय 57 पैशांचाही घोटाळा झालेला नाही. सरकारकडे पुरावे नसल्याने त्यांनी आज न्यायालयाला विनंती केली आहे की, आम्हाला चौकशीसाठी अधिकचा कालावधी देण्यात यावा, न्यायालयानेही ते मान्य केले आहे. आम्हाला न्यायपालिकेवर पूर्णपणे विश्वास आहे. मात्र, ठाकरे सरकारमधील काही नेते, न्याय व्यवस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सोमय्या म्हणाले.