राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या उमेदवारीच्या यादीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अजूनही स्वाक्षरी केली नाही. राज्यपाल यांचे पद घटनात्मकदृष्ट्या महत्वाचे आहे. त्यांना प्रतिवादी बनवता येत नाही, अशी अडचण मांडत शुक्रवारी, १६ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने राज्यापालांच्या भूमिकेवर थेट केंद्र सरकारलाच २ महत्वाचे प्रश्न विचारले आहेत.
राज्यपाल नियुक्त सदस्यांसंदर्भात रतन सोली लुथ नामक व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलेल्या १२ सदस्यांच्या याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही. उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या १२ सदस्यांची नियुक्ती न करण्यात राज्यपालांनी घटनेच्या कलम १६३(१) आणि कलम १७१(५) चं उल्लंघन केल्याचा देखील दावा करण्यात आला आहे.
(हेही वाचा : ईडीची मोठी कारवाई… देशमुखांची कोट्यावधींची मालमत्ता केली जप्त!)
उच्च न्यायालयाचे केंद्राला २ प्रश्न
दरम्यान, या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपालांना या प्रकरणात प्रतिवादी करता येणार नाही, असे नमूद करतानाच केंद्र सरकारलाच दोन प्रश्न विचारून त्यावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठान हे प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये विधिमंडळातील सर्व सभासदांच्या जागा भरणे हे राज्यपालांचे कर्तव्य असताना ते मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर काहीही न करण्याचा मार्ग स्वीकारू शकतात का? तसेच राज्यपाल अशा प्रकारे सदस्य यादीवर स्वाक्षरी न करण्याच्या कृतीला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते का?, असे दोन प्रश्न विचारले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार, १९ जुलैपर्यंत स्थगित केली आहे. त्या दरम्यान केंद्राला या दोन प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले आहे. या प्रश्नांवर उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे