आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्याचे समोर आले आहे. सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली असून त्यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. तसेच न्यायालयाने किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. यावेळी न्यायालयाने असे म्हटले की, पुढील सुनावणी होईपर्यंत सोमय्यांना अटक करू नये.
दिलासा मात्र चार दिवस हजर राहण्याचे निर्देश
अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे थोड्या का होईना पण किरीट सोमय्या यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, न्यायालयाने सोमवारपासून (दि.18) सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देश दिले आहेत.
(हेही वाचा – राज ठाकरेंच्या प्रत्येक मुद्द्याला पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर)
किरीट सोमय्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे आढळले नसल्याने त्यांना न्यायालयाकडून हा अंतरिम दिलासा दिला आहे. उद्या, गुरूवारपासून सलग चार दिवस सुट्टया असल्याने न्यायालयाचे कामकाजही बंद असणार आहे. त्यामुळे आज झालेली सोमय्यांची सुनावणी महत्त्वाची मानली जात होती. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदत निधीत सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी किरीट सोमय्या आणि त्याचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community