गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले समीर वानखेडे यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. समीर वानखेडे यांना मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहे. ठाण्यातील कोपरी पोलीस स्टेशनमध्ये समीर वानखेडेंना 23 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. नवी मुंबईतील सद्गुरू बार अँण्ड रेस्टॉरंटचा मद्यविक्री परवाना खोट्या माहितीच्या आधारे समीर वानखेडे यांनी मिळवल्याचा आरोप आहे आणि त्याच प्रकरणात कोपरी पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे.
उत्पादन शुल्क विभागाकडून तक्रार दाखल
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच समीर वानखेडे यांच्या बारचा परवाना रद्द केला होता. समीर वानखेडे यांच्याविरोधात उत्पादन शुल्क विभागाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबई वाशी येथून गुन्हा वर्ग केल्या नंतर कोपरी पोलीस ठाण्यात कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बारचा परवाना रद्द करण्याच्या आदेशाविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. समीर वानखेडे यांची याचिका इतक्या त्वरित आमच्यासमोर सुनावणीसाठी आलीच कशी, असा सवालही उच्च न्यायालयाने उपस्थित करत फटकारले आहे.
(हेही वाचा टिपू सुलतानचे नाव हटवण्यासाठी मालाडच्या सर्वच शिवसेना नगरसेवकांनी केली ‘ही’ मागणी…)
वानखेडेंनी अटकेविरोधात याचिका दाखल
सामान्य नागरिकांची नियमानुसार अनुक्रमाणे सुनावणीसाठी याचिका येते. मग एखादा प्रभावशाली व्यक्ती असेल तर तातड़ीने सुनावणी होणार का? असा सवालही उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या वकिलांना उपस्थित केला. यासोबतच समीर वानखेडे यांनी या प्रकरणात अटकेविरोधातही याचिका दाखल केली होती. याप्रकरणी विरोधी पक्षाने उत्तर देण्यास वेळ मागितला आहे.
Join Our WhatsApp Community