दसरा मेळावा वाद, शिंदे गटाला धक्का; सदा सरवणकरांची याचिका फेटाळली

मागील ५६ वर्षांपासूनची शिवसेना आणि शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा अशी परंपरा आहे. मात्र यंदाच्या वर्षी शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभी फूट पाडली आहे. त्यामुळे शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहेच, त्यासोबत शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरही दावा केला आहे. शिवाजी पार्कात हा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज उद्धव ठाकरे आणि शिंदे गट या दोघांनी महापालिकेत अर्ज केला, मात्र मुंबई महापालिकेने कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून दोन्ही गटाला परवानगी नाकारली. या प्रकरणी उद्धव गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यासोबत शिंदे गटानेही न्यायालयात धाव घेतली. त्यावर शुक्रवारी, २३ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी उद्धव गटाच्या वतीने वकील आस्पी चिनॉय यांनी युक्तीवाद केला, तर महापालिकेच्या वतीने वकील मिलिंद साठे यांनी युक्तीवाद केला, तर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या वतीने वकील जनक द्वाकरादास यांनी युक्तिवाद केला. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे वकील जनक द्वारकादास युक्तीवाद करताना म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, म्हणून सदा सरवणकर हे शिवसेनेत नाही, हे अनिल देसाई कसे म्हणू शकतात? अनिल देसाई यांनी सांगावे की, आमचा कोणी स्थानिक आमदार नाही. सरवणकर हे शिवसेनेतच आहे आणि सरकार शिवसेनेचे आहे. शिवसेना म्हणजे काय? सचिव अनिल देसाई यांनी अप्लिकेशन म्हणजे शिवसेना का? स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांचे यांचा अर्ज म्हणजे शिवसेना नाही का?, असा युक्तीवाद केला.

(हेही वाचा अनेक वर्षे शिवसेना शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेते, तो आमचा अधिकारच! – उद्धव गटाचा उच्च न्यायालयात युक्तीवाद)

उद्धव गटाने काय केला युक्तीवाद?  

गेली अनेक वर्ष पक्ष तिथे कार्यक्रम घेतो, तर तो त्यांचा अधिकारच आहे. सरवणकर यांनी 30 ऑगस्टला परवानगीसाठी अर्ज केला, तर शिवसेनेने 22 आणि 26 ऑगस्टला अर्ज केला. अनिल देसाईंचे दोन अर्ज पालिकेकडे आले आहेत. जर पोलीस एका आमदाराला आवरू शकत नाहीत तर मग काय उपयोग? यापूर्वी शिवाजी पार्कवर ध्वनी प्रदुषणाचा मुद्दा असायचा. पण साल 2016 नंतर ते मुद्दे उरले नाहीत. साल 2016 चा आदेशच आम्हाला परवानगी देण्याकरता पुरेसा आहे, असे वकील चिनॉय म्हणाले. सरवणकरांच्या याचिकेत त्यांनी आम्हाला विरोध करण्याऐवजी स्वत:साठी मागणी केली आहे,  हे कसे होऊ शकते?, या अर्जातच विसंगती आहे. त्यांचा दावा आहे की, ही खरी शिवसेना नाही, एकनाथ शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना आहे. केवळ एक व्यक्ती विरोध करतो म्हणून परवानगी नाकारणे योग्य नाही, असे ठाकरेंचे वकील म्हणाले. या याचिकेतून किंवा या मेळाव्यातून शिवसेना कुणाची? हे सिद्ध होणार नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळे हस्तक्षेप याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका फेटाळून लावली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here