वानखेडे यांची बदनामी : उच्च न्यायालयाकडून मलिकांना कानपिचक्या

एनसीपीचे प्रवकते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांची बदनामी करणारी विधाने करण्याआधी भान राखावे, वक्तव्य करताना त्यांनी इतरांची नाहक बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांनी कानपिचक्या दिल्या.

नवाब मलिक हे आपल्यासह कुटुंबाची बदनामी करणारी वक्तव्ये सोशल मीडियातून करत असतात, त्याला कोणताही आधार नसतो. त्यामुळे त्यांना सोशल मीडिया अथवा माध्यमांसमोर आपल्याविषयी बोलण्यास प्रतिबंध करण्यात यावा, तसेच त्यांनी आतापर्यंत आपल्याविषयी आणि आपल्या कुटुंबाविषयी केलेले पोस्ट डिलीट करण्याचा आदेश देण्यात यावा, या मागणीसाठी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यासाठी त्यांनी मलिक यांच्याविरोधात बदनामी केल्याबद्दल १.२५ कोटीचा दावा दाखल केला आहे. त्यात त्यांनी हे म्हटले आहे. यावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

मलिकांनी विधाने तपासून केली नाहीत

यावेळी न्यायालयाने नवाब मलिक यांना वानखेडे यांच्याविरोधात विधाने करण्यास प्रतिबंध करण्यास नकार दिला. मात्र नवाब मलिकांची यांनी वानखेडे यांच्या विषयी जी विधाने केली आहेत, ती त्यांनी योग्य पद्धतीने तपासून केलेली नाही, असे परखड मत न्यायालयाने नोंदवले आहे.

मलिक यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश

या प्रकरणी न्यायालयाने मलिक यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे म्हणणे दोन आठवड्याच्या आत मांडण्याचा आदेश देत या प्रकरणाची सुनावणी २० डिसेंबर पर्यंत स्थगित केली आहे. याआधीच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने मलिक यांनी ते कोणत्या कागदपत्रांच्या आधारे ज्ञानदेव वानखेडे मुस्लिम आहेत, ती कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचा आदेश दिला होता, त्याप्रमाणे मलिक यांनी कागदपत्रे सादर केली. त्याचवेळी ज्ञानदेव वानखेडे यांनीही ते मुस्लिम नसून दलित हिंदू असल्याचे दाखले देणारे कागदपत्रे न्यायालयात दाखल केली आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here