राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मागील महिनाभरापासून जातीयवादी आणि ब्राह्मणद्वेष्टे असल्याचा आरोप होत आहे. यावर एका ब्राह्मण व्यक्तीने पवारांकडे चर्चेसाठी वेळ मागितली, तर पवारांनी सगळ्या संघटनांना चर्चेसाठी बोलावण्यास सांगितले. त्यानुसार ही बैठक झाल्यावर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील तपशील मांडला. मात्र या बैठकीतील मुद्द्यांविषयी शरद पवारांनी जे सांगतिले ते दिशाभूल करणारे आहे, असे सांगत ब्राह्मण संघटनांनी शरद पवारांचा निषेध केला आहे. तसेच पवारांच्या बैठकीत उपस्थित ब्राह्मण संघटनांचे प्रतिनिधी आणि अन्य प्रतिनिधी बुधवारी, २५ मे रोजी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन पवारांनी दिशाभूल केलेल्या वक्तव्यांविषयी भूमिका मांडणार आहेत.
शरद पवारांनी माध्यमांना काय सांगितले?
बैठकीनंतर शरद पवार यांनी ब्राह्मण संघटनांनी ब्राह्मण समाजाला आरक्षण हवे असल्याची मागणी केल्याचे म्हटले आहे. ‘अलिकडच्या काळात ग्रामीण भागातील ब्राह्मण समाजाचा वर्ग हा नागरी भागात जास्त येतोय. त्यामुळे नोकरीमध्ये संधी मिळवण्यासाठी आरक्षण मिळावे ही त्यांची दुसरी मागणी होती. मात्र साधारणत: महाराष्ट्रातील आणि केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार अशा नागरी भागातील नोकऱ्यांचे लोकसंख्येतील प्रमाण पाहता मला स्वत:ला याठिकाणी आरक्षणाचे सूत्र बसेल असे वाटत नाही, असे मत मी बैठकीत मांडले. आरक्षण हे कोणालाच देऊ नका अशी बैठकीला आलेल्यांची भूमिका होती. मात्र असे करता येणार नाही. देशातील दलित, आदिवासी, ओबीसी या घटकाला आरक्षण हे द्यावेच लागेल. हा वर्ग शैक्षणिक आणि प्रगतीसंदर्भात मागे राहिलेला आहे. त्यामुळे इतर समाजाच्या स्तरापर्यंत हा वर्ग येईपर्यंत आरक्षणाची अशी चर्चा करता येणार नाही. त्यामुळे आरक्षणाला तुम्ही विरोध करू नये असे मत मी त्यांच्यापुढे मांडले. विविध समाजांना विकासाला अथवा व्यवसायाला मदत करण्यासाठी विविध महामंडळे आहेत. तशा प्रकारचे महामंडळ ब्राह्मण समाजासाठी स्थापन व्हावे अशी तिसरी मागणी त्यांनी मांडली. त्याला परशुराम हे नाव सुचवण्यात आले आहे. मात्र हा प्रश्न माझ्या संबंधात नसून राज्य सरकारशी निगडीत आहे. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना याची माहिती देऊन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे बैठकीसाठी वेळ मागू, असे मी सर्वांना आश्वस्त केले. यानंतर ही बैठक संपली’, असे पवारांनी पत्रकार परिषदेत सविस्तर मुद्दे सांगितले आहेत.
ब्राह्मण संघटनांनी केला निषेध!
बैठकीत उपस्थितांपैकी एक पत्रकार भालचंद्र कुलकर्णी यांनी यावर आक्षेप घेतला. भालचंद्र कुलकर्णी यांनी ट्विट करत पवारांनी बैठकीतील मुद्यांबाबत दिशाभूल करणारी वक्तव्ये केली आहेत, असा आरोप केला. यावेळी कुलकर्णी म्हणाले, ‘अहो साहेब, ब्राह्मण समाजाला आरक्षण नको, ‘संरक्षण’ हवे आहे, असे आम्ही म्हणालो. मी स्वतः हे निवेदन केले. तुम्ही धादांत खोटे बोलत आहात. आरक्षणसंबंधी बैठकीत काहीही चर्चा झाली नाही. दुसऱ्या समाजाला आरक्षण मिळू नये, असे कधीही ब्राह्मण समाजाने म्हटलेले नाही. तुम्ही निष्कारण दुही पसरवत आहात. ‘आम्ही सारे ब्राह्मण’ या मासिकाचा मी संपादक आहे, पत्रकार या नात्याने मी समक्ष उपस्थित होतो. ऐकीव माहितीवर बातमी छापणे योग्य नाही. सर्व बैठक ऐकली आणि मी स्पष्टपणे ठाम भूमिका देखील मांडली. मी कोणत्याही संघटनेचा पदाधिकारी नाही. प्रत्यक्ष झालेली चर्चा वेगळीच आणि घडले वेगळेच! हे दुर्दैव!’
Join Our WhatsApp Community