मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मुंबईत मारहाण केली, त्यामुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला होता. त्यानंतर पायावरील शस्त्रक्रियेचे कारण देत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता. आता हेच ब्रिजभूषण सिंह काही दिवसात महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती आहे. २० डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान राज्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धांना ब्रिजभूषण सिंह उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे मनसे विरुद्ध ब्रिजभूषण सिंह असा सामना आता रंगणार आहे.
उत्तर भारतीयांची माफी मागण्याची केलेली मागणी
मे २०२२ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा आयोजित केला होता. मात्र राज ठाकरे यांनी मुंबईत उत्तर भारतीयांविरोधात जे आंदोलन केले होते, त्याविरोधात जोपर्यंत समस्त उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली होती. राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते अयोध्येत आलेच तर परत जाऊ शकणार नाहीत, असे थेट आव्हानच ब्रिजभूषण सिंह यांनी दिले होते.
(हेही वाचा कोल्हापुरात लव्ह जिहाद! वातावरण तणावग्रस्त, हिंदुत्वादी संघटना उतरल्या रस्त्यावर)
ब्रिजभूषण कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्रात येण्याची शक्यता
राज्यात भाजप आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत, अशी चर्चा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थ येथे आले होते. या पार्श्वभूमीवर ब्रिजभूषण सिंह महाराष्ट्रात आले तर मनसेची भूमिका काय असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ब्रिजभूषण सिंह हे गेल्या १० वर्षांपासून कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. तसेच ते स्वत: पैलवान राहिले आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहू शकतात.
Join Our WhatsApp Community