२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी खोटे बोलून शिवसेना-भाजपची युती तोडली, तसेच शिवसैनिकांचा विश्वासही तोडला. असे खोटे बोलणाऱ्यांची जागा दाखवण्याचा आपला संकल्प आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंकल्प यात्रेला शनिवार, ६ जानेवारीपासून सुरुवात झाली. या यात्रेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सभा घेत आहेत. या शिवसंकल्प अभियानाच्या दौऱ्याची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघापासून करण्यात आली आहे. या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
(हेही वाचा Raj Thackeray : कोकण किनारपट्टीला मोठा धोका; राज ठाकरेंचा इशारा)
काय म्हणाले मुख्यमंत्री?
सत्ता येताच उद्धव ठाकरे यांनी टुणकन उडी मारून ते मुख्यमंत्री झाले. बाळासाहबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही सत्तेवर लाथ मारली, जर आम्ही निर्णय घेतला नसता तर शिवसेना रसातळाला पोहचली असती. आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही. फिल्डवर राहून काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. शेतकरी संकटात असताना आमच्या महायुती सरकारने मदत केली. हे सरकार लोकांसाठी आहे. सामान्य जनतेचे हे सरकार आहे. विरोधकांना स्वतःवर विश्वास नाही. विरोधाक भरकटले आहेत. अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत. तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल तुमचे आभार. संकल्प पूर्ण करायला जिद्द, मेहनत आणि निर्धार लागतो. मी एक शिवसैनिक म्हणून अगदी मनापासून काम करतो, हीच बाळासाहेबांची शिकवण आहे. मला पदाचा मोह नव्हता, मी पक्ष वाचवण्यासाठी ही भूमिका घेतली, असेही मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.
Join Our WhatsApp Community