महाराष्ट्रातील सगळ्याच राजकीय पक्षांनी २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशातच एक नवा राजकीय पक्ष राज्याच्या राजकारणात पाय रोवून उभं राहण्यासाठी प्रयत्नशील आहे. BRS पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आहे. या पक्षात महाराष्ट्रातील अनेकांनी प्रवेश केला आहे. तर काहींचा पक्षप्रवेश येत्या काळात होणार आहे. पण BRS पक्षाचा महाराष्ट्राच्या राजकारणात विस्तार होतोय. BRSच्या महाराष्ट्र विस्ताराचा कोणाकोणाला फायदा होणार याचा अढावा घेण्याचा प्रयत्न…
जनतेसाठी राज्यात नवा पर्याय तर राजकीय पक्षांसाठी नवा स्पर्धक
महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना-ठाकरे गट हे पाच प्रमुख राजकीय पक्ष आहेत. तसंच इतरही काही प्रादेशिक पक्ष सक्रीय आहेत. अशातच BRSच्या प्रवेशाने जनतेसाठी एका नव्या पक्षाचा पर्याय समोर असेल अन् राजकीय पक्षांसाठी मात्र आणखी एक स्पर्धक राज्याच्या राजकारणात येणार आहे.
BRS मुळे मतांमध्ये नवा वाटेकरी तयार होणार
आणखी एक पक्ष राज्याच्या राजकारणात सक्रीय झाल्याने याचा परिणाम सहाजिकच निवडणुकांवर होणार आहे. निवडणुकांमध्ये मतांचं विभाजन होणार हे निश्चित आहे. त्यामुळे राज्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये मतांचा नवा वाटेकरी तयार होणार आहे.
मुस्लिम – दलित मतांवर परिणाम होऊ शकतो.
केसीआर यांनी नांदेडमधून राज्याच्या राजकारणात प्रवेश केला आहे. BRSकडून करण्यात येणाऱ्या जाहिराती आणि त्यांच्या भाषणातील मुद्दे पाहता BRSच्या एन्ट्रीने राज्यातील मुस्लिम आणि दलित मतांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता दाट आहे.
नव्याने राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरूणाईला संधी प्राप्त होईल
ज्या लोकांना राजकारणात यायचं आहे. नव्या संधीच्या शोधात आहेत. अशा लोकांसाठी विशेषत: तरूणांसाठी राजकारणात एन्ट्री करण्यासाठी मोठी संधी असेल. त्यामुळे तरूण वर्ग या पक्षाकडे आकर्षित होण्याची शक्यता अधिक आहे.
(हेही वाचा – सर्व आरोपींना अटक होत नाही तोवर ‘काम बंद आंदोलन’ सुरूच राहणार: एच पूर्व कार्यालयाबाहेर कामगार, अधिकारी आक्रमक)
इतर पक्षातील नाराज नेत्यांना पुनर्वसनाची संधी मिळू शकते.
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता सगळ्याच पक्षात कुणाची ना कुणाची नाराजी पाहायला मिळते. काम करण्याची संधी मिळत नाही, असं म्हणत राज्यात पक्षांतर होत आहेत. अशा या सगळ्याच पक्षातील नाराज नेत्यांसाठी ही संधी असेल. त्यामुळे या राजकीय नेत्यांना आपलं राजकीय पुनर्वसन करण्याची मोठी संधी या निमित्ताने मिळणार आहे आणि अशाच नेत्यांची BRS चाचपणी करत आहे.
भारत राष्ट्र समिती आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आपले पक्षाचे बस्तान बसविण्याचे ठरविले असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा वंचित, एमआयएम यांच्यासह काही छोट्या पक्षांना सोबत घेऊन आघाडी करणार आहेत. यात दलित, मुस्लिम आणि शेतकरी यांच्या मतांवर केसीआर यांचा डोळा आहे.
काही महिन्यांपूर्वी केसीआर यांनी प्रकाश आंबेडकर यांचा हैदराबाद येथे सत्कार केला होता, तर हैदराबाद महापालिकेत भारत राष्ट्र समिती आणि एमआयएम यांच्या आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे वंचित आणि एमआयएम या दोन्ही पक्षांसोबत भारत राष्ट्र समितीची आघाडी होणार आहे. अलीकडे प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक झाले होते. यावरून राज्यात वादंग निर्माण झाला आहे. त्यामुळे केसीआर, एमआयएम आणि वंचित यांची दिशा स्पष्ट होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community