-
सुजित महामुलकर
भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुती सरकारचे पहिलेवहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात भाजपा-शिवसेना (शिंदे) विरुद्ध शिवसेना उबाठा यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. पहिल्याच आठवड्यातील दोन-तीन घटनांवरून सत्ताधारी आमदारांच्या रडारवर आदित्य ठाकरे आले असून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपा-सेनेकडून होण्याची शक्यता आहे. राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. सत्तेवर येण्यासाठी १४५ च्या ‘मॅजिक फिगर’ ची गरज असते. एकट्या भाजपाकडे (अपक्षांसह) जवळपास १३७ आमदार विधानसभेत आहेत. त्यामुळे एक राजकीय पक्ष म्हणून भाजपा राज्यात अत्यंत मजबूत स्थितीत आहे. (Budget Session 2025)
‘बदला’ नव्हे ‘बदल’
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर २०१४ नंतर पुन्हा एकदा विश्वास टाकत महायुती सरकारचे नेतृत्व करण्याची संधी दिली. २०१४ च्या तुलनेत आपण अधिक प्रगल्भ’ (मॅचुअर) झाल्याची कबुली देत आता ‘बदला’ घेण्याचे नाही तर ‘बदल’ घडवण्याचे राजकारण करणार असल्याचे फडणवीस सांगतात. तशी कृतीही त्यांनी केल्याची चर्चा आहे. उदाहरणार्थ, आदित्य ठाकरे यांना ‘पेंग्विन’ किंवा ‘म्याव.. म्याव’ अशा शब्दांत डिवचू नये, अशा स्पष्ट सूचना फडणवीस यांनी भाजपा आमदारांना दिल्याचे बोलले जाते. (Budget Session 2025)
(हेही वाचा – Water Tank साफ करताना 5 कामगारांचा मृत्यू)
आदित्य विरुद्ध शिवसेना
अधिवेशनाचे पहिले दोन दिवस आदित्य ठाकरे आणि त्यांचा गट शांत होते. तिसऱ्या दिवशी (५ मार्च २०२५) प्रश्नोत्तराच्या तासात, राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये भूजल नायट्रेटचे प्रमाण रोखण्याबाबतचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नावर मंत्री गुलाबराव पाटील (शिवसेना-शिंदे) हे सविस्तर उत्तर देत असतानाच आदित्य ठाकरेंनी आसनावर बसूनच पाटील यांच्या उत्तरात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. उभे न राहता बसूनच काही काही प्रश्न विचारत असल्याने पाटील संतापले. त्यांनी ‘तुम्ही शांत बसा, तुम्ही शांत बसा,’ असा दम भरला. त्यावर आदित्य ताडकन उठून बोलण्यासाठी उभे राहिले. अध्यक्षांनी मात्र मध्यस्थी करत विषय वाढू न देण्याचा प्रयत्न केला. (Budget Session 2025)
त्यानंतर संधी मिळताच आदित्य ठाकरे यांनी ‘मंत्र्यांनी उत्तरात सांगितले की, अन्य खात्यांशी संयुक्त बैठका लावून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, तर यांना (गुलाबराव पाटील) खाते कळलं आहे की नाही? मंत्री सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाही उत्तरे देऊ शकत नाहीत, त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवा आणि मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या,’ अशी खोचक टिप्पणी ठाकरे यांनी अध्यक्षांकडे बघून केली. त्याला मात्र पाटील यांनी कडक शब्दांत उत्तर दिले. अध्यक्षांकडे बघूनच ‘त्यांच्या * ला मी कळलो होतो, म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं, हे त्यांना माहीत नाही अजून,’ असे सांगून पाटील यांनी तेच वक्तव्य पुन्हा दुरुस्त केले आणि दुसऱ्या वेळी त्याच वाक्यात ‘वडिलांना’ अशी सुधारणा केली. (Budget Session 2025)
(हेही वाचा – Hawkers : वाह रे महापालिका; स्टेशनजवळ फेरीवाल्यांचे धंदे जोरात, पण पुढे कारवाई)
आदित्य विरुद्ध भाजपा
चौथ्या दिवशीही आदित्य ठाकरे यांच्यावरून झालेल्या वादानंतर ५ मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्याची वेळ आली. विधानसभेत महायुतीचे आमदार आणि आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठीविषयी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाची यावरील भूमिका स्पष्ट केली. त्यावर मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी म्हणून उठलेल्या आदित्य ठाकरे यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बोलण्याची संधी न देता, आपले आभार मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो, असे सांगून खाली बसण्याची सूचना केली. पण आदित्य बसण्याच्या मनःस्थितीत नव्हते आणि शिवसेना उबाठाचे अन्य आमदारही त्यांच्या बाजूने उठून उभे राहिले. तेव्हा महायुतीच्या आमदारांनी त्यांना शाब्दिक टोचण दिले. योगेश सागर, महेश बालदी, अमित साटम हे आमदारच नाही तर मंत्री नितेश राणे, आशिष शेलार यांनीही त्याच जोशात विरोध करायला सुरुवात केली. निवडणुक काळात आदित्य ठाकरे यांनी मतदारसंघामध्ये गुजराती भाषेत लावलेल्या फलकांचा मुद्दा महायुतीच्या आमदारांनी सभागृहात मांडला. यावेळी दोन्ही बाजूच्या आमदारांनी हातवारे करत सभागृहात वाद घातला आणि अध्यक्षांना सभागृहाचे कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. (Budget Session 2025)
आपलाच शेवटचा शब्द; इथे नाही चालणार
याबाबत भाजपाच्या एका आमदाराने ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले की, ‘आदित्य ठाकरे यांनी एका ज्येष्ठ आमदाराची ‘लायकी’ काढली. त्या आमदाराला आदित्य यांच्या वयाचा मुलगा असेल. आदित्य हे वयाचा किंवा ज्येष्ठतेचा विचार करत नाहीत. आपलाच ‘शेवटचा शब्द’ (लास्ट वर्ड) असेल या आवेशात असतात. आदित्य हे केवळ अडीच वर्षे मंत्री पदावर होते. सभागृहात १५-२० वर्षे मंत्री पदावर असलेले सदस्य आहेत, तेही कधी असे वागत नाहीत. तुम्ही पक्ष प्रमुखांचे पुत्र असाल तर ते तुमच्या आमदारांसाठी मोठे असेल, अन्य पक्षातील आमदारांना त्याचे काय कौतुक?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुसऱ्या एका भाजपाच्या आमदारानेही नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ‘आदित्य यांना सडेतोड उत्तर दिले नाही तर आम्ही चुकतोय असा संदेश जनतेत जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार.’ यावरून हे अधिवेशन भाजपा-सेना विरुद्ध ठाकरे असे रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अद्याप पुढील अडीच आठवडे, २६ मार्च २०२५ पर्यंत अधिवेशन कालावधी निश्चित झाल्याने पुढील काही दिवस तरी सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे असतील, असे दिसते. (Budget Session 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community