माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ विधानसभेत बोलायला उभे राहताच महाविकास आघाडीच्या आमदारांनी पळ काढला. त्यामुळे गुरुवारी सभागृहात काहीकाळ हशा पिकला.
राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत गॅस दरवाढ आणि महागाईवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मुद्दे खोडून काढत जोरदार पलटवार केला. मात्र, त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला.
( हेही वाचा: Kasba Bypoll Election Result 2023: भाजपच्या बालेकिल्ल्यात मविआचा विजय; रवींद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी )
विरोधी आमदार सभागृहाबाहेर पडतील इतक्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांना राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्यास वेळ दिली. त्यामुळे भुजबळ कोंडीत सापडले. जयंत पाटील यांनी सभात्याग केल्याने आपणही बाहेर जावे, की अभिभाषणावर बोलावे, असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला. कारण एकदा वेळ गेली की पुन्हा मिळणार नाही, याची कल्पना त्यांना होती.
अध्यक्षांचा भुजबळांना टोमणा
परंतु, स्वपक्षातील आमदारांनी आग्रह केल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव भाषण सोडून सभात्याग करावा लागला. भाषणसंधी हिरावली गेल्याने भुजबळांच्या जीवाची झालेली घालमेल पाहून सभागृहात काहीकाळ हशा पिकला. शेवटी भुजबळ बाहेर गेले आणि जयंत पाटील यांची परवानगी घेऊन एकटेच पुन्हा परतले. त्यानंतर अध्यक्षांना विनंती करून पुनर्संधी देण्याची विनंती केली. अध्यक्षांनीही त्यांच्या ज्येष्ठत्त्वाचा मान राखत संधी दिली. पण, ती देताना ‘भुजबळसाहेब असे आत बाहेर, आत बाहेर करू नका’, असा टोमणा लगावण्याची संधी सोडली नाही.
Join Our WhatsApp Community