आमदारांना ‘या’ गुन्ह्याची वाटतेय भीती! सरकारवर आणला दबाव

131

सरकारी कर्मचारी आणि अधिकारी सध्या सर्रासपणे लोकप्रतिनिधींवर 332 आणि 353 अंतर्गत गुन्हा दाखल करत आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मिळणे कठीण बनते म्हणून या कायद्यात सुधारणा करावी, अशी मागणी विधानसभेत लक्षवेधीद्वारे केली. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी याविषयावर अधिवेशन संपण्याआधी सर्व पक्षीय आमदारांची बैठक घेण्यात येईल, त्यानुसार काही सुधारणा सुचवण्यात येईल, असे आश्वासन दिले.

खोटे गुन्हे दाखल होतात 

भाजपचे आमदार आशिष जैस्वाल यांनी लक्षवेधी मांडताना म्हणाले की, लोकप्रतिनिधींना कुठलाही तलाठी धमकी देतो, कोणालाही धमकी दिली जात आहे, गुन्हा गंभीर असेल, तर त्यावर शिक्षा झालीच पाहिजे, मात्र खोटे गुन्हे लावले जात आहेत, त्यावर जामीन मिळत नाही. गंभीर दुखापत असल्यावरच गुन्हा दाखल व्हावा, असे असताना किरकोळ दुखापत होऊनही ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल होत आहे, असे म्हटले. तर भाजपचे आमदार संजय कुटे म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर बैठक झाली. २०१९ नंतर यात कधीच बैठक झाली नाही, मग सुधारणा कोणी दिल्या? आझाद मैदानात छत्रपती संभाजी महाराज यांचे आंदोलन सुरू होते, तेव्हा ऊर्जामंत्री नितीन राऊत तिथे आल्यावर एका तरुणाने घोषणा दिल्या, त्याच्यावर ३५३ लावण्यासाठी मंत्री राऊत यांनी दबाव आणला होता, असे नमुद केले.

३५३ चे सगळे ‘लाभार्थी’ 

आमदार नितेश राणे म्हणाले की, ३५३ चे आम्ही सगळेच लाभार्थी आहेत, आम्ही लोकप्रतिनिधी जनतेची कामे घेऊन अधिका-यांकडे जातो, तेव्हा ते आमच्यावर गुन्हे दाखल करतात, अजून ३-४ महिन्यांनंतर डझनभर आमदारांवर हा गुन्हा दाखल होईल, अशी भीती व्यक्त केली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, मीरा-भाईंदर महापालिकेतील शिवसेनेच्या २२ नगरसेवकांवर त्यांनी सभागृहात गोंधळ घातला म्हणून त्यांच्यावर कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्यावर सर्व नगरसेवकांना अटक करावी लागणार आहे .

तत्काळ गुन्हे मागे घेता येणार नाही 

यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, या कायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन केली आहे, त्यामध्ये पहिल्या समितीला मान्यता मिळू शकली नव्हती. त्यात सुधारणा करायची असेल, तर ती करण्यात येईल, मात्र यावर सर्वंकष चर्चा होणे अपेक्षित आहेत. हा गुन्हा लोकप्रतिनिधी यांच्यावरही गुन्हा दाखल होतो, काऱण रुग्णालयांची तोडफोड होते, सरकारी कार्यालयांवर हल्ले होत असतात. कोणताही गुन्हा दाखल झाल्यावर तो मागे घेण्याची तरतूद आहे. मात्र त्यामागे न्यायालयीन प्रक्रिया असते, त्यामुळे आताच लोकप्रतिनिधींवरील गुन्हे मागे घेता येणार नाही. अधिवेशन संपल्यावर सर्व पक्षीय आमदारांची बैठक घेऊन त्यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.