सध्या फसवणुकीचे प्रकार नवे राहिलेले नाही. दरदिवशी नवा फसवणुकीचा प्रकार समोर येतो. पण आता मात्र चक्क उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईल नंबरचा वापर करुन फसवणूक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा वापर करुन पुण्यातील बड्या बांधकाम व्यावयायिकाला फोन करुन, त्याच्याकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी अटकेत
आरोपी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा वापर करुन, मागच्या दहा दिवसांपासून संबंधित बांधकाम व्यवसायिकाकडे खंडणीची मागणी करत होते. आरोपींच्या त्रासाला कंटाळून बांधकाम व्यवसायिकाने पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. नवनाथ भाऊसाहेब चोरमले, सौरभ नारायण काकडे, सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे, किरण रामभाऊ काकडे, आकाश शरद निकाळजे, चैतन्य राजेंद्र वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात आयपीसी 384,386,506,34 आयटी अॅक्ट कलम 66 (सी),(डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
( हेही वाचा: पाटी बदलण्याचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा? मनसेचा व्यापाऱ्यांना सूचक इशारा )
20 लाखांची खंडणी मागितली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गूगल प्ले स्टोअरवरुन फेक काॅल अॅप नावाचं अॅप डाऊनलोड केलं होतं. या अॅपचा वापर करुन आरोपींनी अजित पवारांचा मोबाईल नंबर वापरला होता. तसेच,आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलतोय असं सांगून 20 लाखांची खंडणी मागितली होती. तसेच वाडेबोलाइ येथील बाबा चोरमले आणि इतर नऊ जणांच्या मालकीच्या जमिनीचा वाद मिटवून टाका, असे सांगितले होते. दरम्यान या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community