महाराष्ट्रासह ६ राज्यांतील ७ जागांसाठी पोटनिवडणूक

100

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील रिक्त जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार ३ नोव्हेंबर रोजी मतदान, तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यात महाराष्ट्रासह ६ राज्यांतील ७ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

( हेही वाचा : LIC सरल पेन्शन योजना; आयुष्यभर दरमहा १२ हजार मिळवा )

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांचे १२ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. रमेश लटके हे त्यांच्या कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. या मतदारसंघातून लटके दोनदा निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यासाठी पोटनिवडणूक होणार आहे.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम

निवडणूक आयोगाच्या पत्रकानुसार ७ ऑक्टोबर रोजी राजपत्राद्वारे अधिसूचना जारी होईल. १४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख, १५ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी, १७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख, ३ नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. ८ नोव्हेंबरच्या आधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट थेट सामना होणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील ६ राज्यांतील ७ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रासह बिहार, हरियाणा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, ओडिशा या राज्यांतील विधानसभेच्या सात जागांचा समावेश आहे. बिहारमधील दोन (१७८ – मोकामा, १०१ – गोपाळगंज), हरियाणामधील ४७ – आदमापूर, तेलंगणामधील ९३ – मुनुगोडे, उत्तर प्रदेशातील १३९ – गोला गोकरननाथ आणि ओडिशामधील ४६ – धामनगर हे मतदारसंघ आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.