डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाच्या अखंडतेसाठी प्राणांचे बलिदान दिले. त्यांनी ‘एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे’ असे निक्षून सांगितले होते. मुखर्जी यांचे काश्मीरबाबतचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी सन २०१९ साली कलम ३७० रद्द करून साकार करून दाखवले, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनसंघाचे अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते शनिवारी बोलत होते. हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. मुखर्जी यांच्या जीवनावर आधारित हे प्रदर्शन २३ जून ते ६ जुलै या कालावधीत देशभरात भरवण्यात येणार आहे.
त्यावेळी मुखर्जींनी विरोध केला
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी प्रखर राष्ट्रभक्त होते. ते विद्वत्तापूर्ण, बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. संसद आणि बंगालमध्ये त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्याकडून तुष्टीकरणाचा प्रयत्न झाला त्यावेळी त्याला डॉ. मुखर्जी यांनी सातत्याने विरोध केला. प्रकांड बुद्धिमत्तेच्या श्यामाप्रसादजींनी राष्ट्रीय राजकारणावर अल्पकाळातच छाप उमटवली होती. नेहरू लियाकत करारातून तुष्टीकरणाचा प्रयत्न होत असून यातून द्वेषाची बीजे रोवली जातील, असे त्यांनी ठणकावून नेहरू यांना सांगितले होते. याकरता त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ३७० कलम हे देशाला विघटनाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणारे आहे, याची जाणीव त्यांनी सरकारला वेळोवेळी करून दिली होती.
भाजपा ‘जे बोलतो ते करतो’
फडणवीस पुढे म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करण्यास राज्याबाहेरील नागरिकांना प्रवेश पत्र घेणे अनिवार्य करण्यात आले होते. कलम ३७० च्या विरोधात भारतीय जनसंघाने सत्याग्रह सुरू केला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमवेत जम्मू येथे निघाले असताना, डॉ. मुखर्जी यांना अटक करण्यात आली. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. तिथेच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. डॉ. मुखर्जी यांच्या बलिदानामुळेच काश्मीर भारतात राहू शकला. त्यानंतर ३७० कलमाविरोधात देशभरात सातत्याने आंदोलने होत राहिली. डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी १९९१-९२ मध्ये या कलमाविरोधात देशव्यापी एकता यात्रा काढली होती. या यात्रेची सांगता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावून झाली. डॉ. मुखर्जी यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. भाजपा ‘जे बोलतो ते करतो’ असेही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितले.
( हेही वाचा: महाबळेश्वरमधील पर्यटनासाठी यापुढे विद्युत वाहन आवश्यक )
श्यामाप्रसाद मुखर्जी हे अभ्यासू व्यक्तिमत्व
प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी झालेले भाजपचे राष्ट्रीय सह-संघटन मंत्री शिवप्रकाश म्हणाले की, डॉ. मुखर्जी हे देशाच्या एकता आणि अखंडतेचे पहिले बलिदान होते. प्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्या मुंबई भारतीय जनता पार्टीचे त्यांनी आभार मानले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे अभ्यासू व्यक्तिमत्व होते. ते आधी काँग्रेस आणि नंतर हिंदू महासभेत सामील झाले, पण त्यांनी नेहमीच देशाला पुढे नेण्यासाठी आणि हिंदुत्वासाठी काम केले.
Join Our WhatsApp Community