राणीबाग शुद्ध शाकाहारीच : शिवसेनाच मांसाहाराच्या विरोधात

भायखळा राणीबागेतील प्राणिसंग्रहालयामधील प्राण्यांना मांसाहार दिला जात असला, तरी तेथे भेट देण्यास येणाऱ्या नागरिकांना मासांहारी खाद्यपदार्थ तेथील उपहारगृहात अर्थात कॅफेटेरियामध्ये उपलब्ध करून दिला जाणार नाही. राणीबागेतील कॅफेटेरियाची जागा भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव मंजूर करताना सत्ताधारी शिवसेनेने शाकाहारी खाद्यपदार्थ देण्यास हिरवा दिवा दाखवत मांसाहार करणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड केला आहे. त्यामुळे शिवसेनेला आता शाकाहार मान्य असून भविष्यात शिवसेनाही शाहाकारीच्या बाजुने झुकत असल्याने मुंबईतील कोळीवाड्यांसह मासे विक्रते आणि चिकन, मटन  विक्रेत्यांचे धंदे हद्पार होण्याची भीती वर्तवली जात आहे.

पुन्हा चर्चा रंगली

सर्वाधिक शाकाहार-पूरक शहर म्हणून पिटा इंडिया या संस्थेचा २०२१चा मुंबईला प्राप्त झालेला पुरस्कार महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वीकारल्यानंतर मुंबईत शाकाहार आणि मांसाहाराची पुन्हा चर्चा रंगली. मात्र, ही चर्चा रंगलेली असतानाच राणीबागेतील उपहारगृह अर्थात कॅफेटेरिया हेही शुध्द शाकाहारीच असणार आहे. या उपहारगृहात कोणतेही मांसाहारी खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार नाही, असा स्पष्ट उल्लेख करत कॅफेटेरियाची जागा भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. हे उपहारगृह पुढील पाच वर्षांकरता चालवण्यास देण्यासाठी महापालिकेने परिचय ग्लोबल वर्क्स यांना पहिल्या वर्षात प्रती माह पाच लाख ५० हजार २५ रुपये भाडे आकारले जाण्यास मंजुरी देण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.

(हेही वाचा तीन दिवसांनी महापौरांना आठवण झाली वरळीतील जखमींची)

राणीबागेतील प्रवेश शुल्क भरावे लागणार

पेंग्विन कक्ष इमारतीमध्ये तळ मजल्यावर सुमारे ५३३ चौरस मीटरच्या जागेत हे उपहारगृह आहे. ज्यामध्ये मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा, आसन व्यवस्था, पिण्याची पाणी, स्वच्छतागृह, गॅस बॅक आदींची सुविधा आहे. राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांसाठी खानपानाची सुविधा म्हणून हे उपहारगृह बनवण्यात आले आहे. जर बाहेरील लोकांना या उपहार गृहात येण्यासाठी त्यांना राणीबागेतील प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. हे उपहारगृह सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुले राहणार असून तिथे २०० माणसांची क्षमता आहे.

सत्ताधारी शिवसेनेनेची साथ

याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता शिवसेनेने संबंधित उपहारगृहाला मांसाहारी खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याची अट उपसूचनेद्वारे न घालता शाकाहारी खाद्यपदार्थाची विक्री करण्यास परवानगी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे राणीबागेत जाणाऱ्या पर्यटकांना कॅफेटेरियामध्ये केवळ शाकाहारीच खाद्यपदार्थ उपलब्ध होणार असून काही शाकाहारी खाद्यपदार्थांचा पुरस्कार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी राणीबागेतील या उपहारगृहात मांसाहारी खाद्यपदार्थ कशाप्रकारे मिळणार नाही, याची जास्त काळजी घेतली होती. याला सत्ताधारी शिवसेनेनेही साथ दिल्याचे सुधार समितीच्या बैठकीतील मंजूर प्रस्तावावरून स्पष्ट होत आहे. समिती अध्यक्ष सदा परब यांनी कोणत्याही प्रकारची चर्चा करू न देता हा प्रस्ताव संमत करत शिवसेनेला मांसाहार मान्य नसल्याचा संदेश दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here