शिंदे-फडणवीस सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात नव्या मंत्र्यांना शपथ देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, त्यात २१ जणांना संधी मिळू शकते.
(हेही वाचा – Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीत जागा वाटपावरून चढाओढ; आघाडीत होऊ शकते बिघाडी)
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार त्यांच्यासमवेत होते. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात एकूण २१ मंत्री शपथ घेतील. त्यातील १४ कॅबिनेट, तर ७ राज्यमंत्री असतील. कॅबिनेट मंत्रिपदांपैकी भाजपाला १०, तर शिंदे गटाच्या वाट्याला ४ मंत्रीपदे येणार आहेत. शिंदे गट त्यातील दोन पदे अपक्ष आमदारांना सोडणार आहे. राज्यमंत्री पदांचा विचार करता भाजपामधून ४ आणि शिंदे गटाकडून तीन आमदार शपथबद्ध होतील, असे कळते.
हेही पहा –
नड्डांसोबतच्या (J. P. Nadda) बैठकीत मंत्रिमंडळातील काही संभाव्य नावांवरही चर्चा झाली. भाजपमधून माजी मंत्री संजय कुटे, जयकुमार रावल, नितेश राणे, प्रशांत ठाकूर, योगेश सागर, माधुरी मिसाळ, किसन कथोरे, राणा जगजितसिंह पाटील, रणधीर सावरकर; तर शिवसेनेकडून संजय शिरसाट, भरत गोगावले, यामिनी जाधव, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची नावे समोर येत आहेत. विस्ताराची जास्त डोकेदुखी शिंदे यांना आहे. कारण, त्यांच्याकडे ४० इच्छुक आहेत व त्यातून सहा ते सात जणांना संधी देण्याचे आव्हान असेल.
जबाबदाऱ्यांचे फेरवाटप होणार?
– सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह २० मंत्री आहेत. त्यातही मोजक्याच मंत्र्यांवर अनेक खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
– मदतीला राज्यमंत्री नसल्याने अधिवेशन काळात त्यांच्यावर कामाचा मोठा ताण येतो.
– पालकमंत्री म्हणूनही एका मंत्र्यांकडे दोन किंवा त्यापेक्षा अधिक जिल्हे आहेत. त्याचा ताण जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित निर्णय प्रक्रियेवर येत आहे.
– शिवाय मंत्रिमंडळ विस्तार राखडल्याने इच्छुक आमदारांमधील निराशा वाढत आहे. आता मे महिन्यात विस्तार झाला, तर हे सगळेच प्रश्न मार्गी लागतील.
– सध्याच्या मंत्रिमंडळात आणखी २० मंत्र्यांची भर पडली की जबाबदाऱ्यांचे फेरवाटप होण्याचीही शक्यता आहे.