राज्याच्या मंत्रिमंडळाला सर्वाधिक मंत्री देणाऱ्या मराठवाड्यात तब्बल ७ वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) होऊ घातली आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी ही बैठक होणार असून, मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवला आहे.
याआधी सात वर्षांपूर्वी म्हणजेच ४ ऑक्टोबर २०१६ रोजी औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आता १६ सप्टेंबरला बैठक घेण्याचे नियोजन आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या जिल्ह्यातील निर्णयांच्या अंमलबजावणीची स्थिती, जिल्हानिहाय राबवावयाच्या विकास योजनांचे प्रस्ताव तयार करावे, लागणाऱ्या निधीबाबत माहिती द्यावी. जिल्ह्याचा आणि विभागाचा विकास होण्याच्या दृष्टीने हे प्रस्ताव तयार करुन सादर करावे, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी सातही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
(हेही वाचा : Job Alert : आरोग्य विभागात मेगा भरती)
दरम्यान, मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांचा मंत्री मुनगंटीवार यांनी सोमवारी आढावा घेतला. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम केंद्रभागी ठेवून विविध स्पर्धा, दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच माहितीपट तयार करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले.
मराठवाडा उपेक्षितच
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेतले जाते. मधली काही वर्षे त्याबाबत उदासिनता होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आग्रहपूर्वक अधिवेशन नागपुरात घेतले. प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मराठवाड्यात अधिवेशन होत नसले, तरी मंत्रिमंडळाच्या बैठका व्हाव्यात असा संकेत आहे. मात्र, सर्वाधिक मंत्री देणारा मराठवाडा त्याबाबतीत उपेक्षित आहे. गेल्या १५ वर्षांत मराठवाड्यात केवळ दोनदा कॅबिनेट बैठक झाली आहे. २००८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. त्यानंतर २०२६ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये कॅबिनेट बैठक झाली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community