मुंबई पालिकेतील काही कामांत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे या कामांचे ‘कॅग’ ऑडिट केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.
( हेही वाचा : राज्यात १४ जिल्ह्यांत कौटुंबिक न्यायालये कायमस्वरूपी ठेवण्यास मान्यता – उपमुख्यमंत्री)
विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिका संदर्भात अनेक सदस्य बोलले. कोविड सेंटर घोटाळे, रस्त्याची गुणवत्ता असे अनेक विषय आले. पण आता दर्जेदार कामांवर भर देण्यात येईल. रस्ते हा प्राधान्यक्रमाचा विषय आहे.
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू करून कामे केल्याचे निदर्शनास आले आहे. याची नगरविकास विभागामार्फत चौकशी आणि तीही कालबद्ध पद्धतीने करण्यात येईल. चौकशीचा निव्वळ फार्स करता येणार नाही. कालबद्ध वेळेत या चौकशी करण्यास महापालिकेत सांगण्यात येईल. ‘कॅग’चे विशेष ऑडिट मुंबई महापालिकेत करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरे
आश्रय योजनेतील भ्रष्टाचारासंदर्भात सुद्धा तपासून पाहण्यात येईल. आधीच्या सरकारने सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने देऊ नये, असे म्हटले होते. मात्र, आमचे सरकार २९ हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने देईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
Join Our WhatsApp Community