विधान परिषद निवडणुकीचं कसं आहे ‘गणित’? कोणासाठी पेपर सोपा, कोणाला कठीण?

राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत जोर लावलेला असतानाच, भाजपही पुन्हा एकदा विजयी झूल पांघरण्यासाठी लढत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या आधी या सर्व पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पण या निवडणुकीसाठी कसं आहे मतांचं गणित?

प्रत्येक उमेदवारासाठी किती मतांचा कोटा

राज्याच्या विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या 288 आहे. पण शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे ही संख्या 287 झाली आहे. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी नाकारल्यामुळे प्रत्यक्ष मतदान करणा-या आमदारांची संख्या 285 आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे मिळून 6, तर भाजपचे 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे 285 आमदार भागिले 11 उमेदवार या गणितानुसार प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 26 मतांची गरज आहे.

(हेही वाचाः राज्यसभेत कोण फुटलं हे कळलेलं आहे, मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण)

शिवसेना

शिवसेनेचे एकूण 55 आमदार असून त्यांचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी असे दोन उमेदवार आहेत. शिवसेनेला एकूण 8 अपक्ष आणि छोट्या पक्षांचं समर्थन आहे त्यामुळे शिवसेनेच्या मतांची संख्या 63 आहे. कुठलीही जोखीम न घेण्यासाठी शिवसेनेने आपल्या मतांचा कोटा जरी 26 ऐवजी 30 केला तरी त्यांच्याकडे दोन उमेदवारांना निवडून दिल्यानंतर 3 मतं शिल्लक राहतात. पण समर्थनात असलेले 8 आमदार जरी फुटले तरी 55 आमदारांच्या पाठबळावर शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील.

राष्ट्रवादी काँग्रेस

मलिक आणि देशमुख यांची मतं वगळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे 52 आमदारांचं पाठबळ आहे. त्यामुळे 26 मतांच्या नियमानुसार राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे हे दोन्ही उमेदवार काठावर पास होतील. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी करण्यात आली असून, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे. त्यांनी राज्यातील अनेक अपक्ष आणि छोट्या आमदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे समर्थन मिळवले आहे. तसेच आपल्या सर्व आमदारांना देखील निवडणुकीत योग्य मतदान करण्याची ताकीद देण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांची स्वतः रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनी भेट घेतली आहे.

(हेही वाचाः विधानसभेने ठरवले तर राज्यातील विधान परिषदच रद्द होऊ शकते, कशी? वाचा)

काँग्रेस

काँग्रेसचे विधानसभेत एकूण 44 आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे पहिले उमेदवार भाई जगताप हे या निवडणुकीत सहज निवडून येतील. पण काँग्रेसचे दुसरे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना विजयासाठी एकूण 8 मतं कमी पडत आहेत. त्यामुळे आपल्या दुस-या उमेदवाराला निवडून आणणं हे काँग्रेससमोर आव्हान असणार आहे. त्यामुळे शिवसेनेची अतिरिक्त मतं आणि इतर अपक्षांची मतं मिळाली, तरंच हंडोरे यांची होडी या निवडणुकीत तरणार आहे.

भाजप

भाजपचे एकूण 5 उमेदवार रिंगणात असून, त्यांचे 106+6 अपक्ष आमदार मिळून एकूण 112 आमदार आहेत. त्यामुळे 26 मतांच्या कोट्यानुसार भाजपचे प्रवीण दरेकर, उमा खापरे, राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय हे चार आमदार सहज निवडून येतील. त्यानंतर भाजपकडे एकूण 8 मतं शिल्लक राहतील. त्यामुळे भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना वियजासाठी 18 मतांची आवश्यकता असणार आहे. त्यामुळेच भाजपनेही मतांची जुळवाजुळव केली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांची बैठक घेत मतदानासंबंधी सूचना केल्या आहेत. तसेच या निवडणुकीत गुप्त मतदान असल्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत असंतोषच आम्हाला ही निवडणूक जिंकवून देईल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या या भाकीतानुसार, मविआतील आमदार फुटणार का आणि फडणवीस राज्यसभेप्रमाणेच या निवडणुकीतही आपला जलवा दाखवणार का?, हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे.

(हेही वाचाः सर्वपक्षीय हॉटेल डिप्लोमॅसी! राऊत म्हणतात, गावाकडच्या आमदारांना इथे कधी रहायला मिळणार! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here