राज्यसभा निवडणुकीतील मतांचा कमी झाला ‘कोटा’! कोणाचा ‘फायदा’, कोणाचा ‘तोटा’?

177

बहुप्रतिक्षित असलेली राज्यसभा निवडणूक ही आता अवघ्या काही तासांवर आली आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक इतकी चुरशीची झाल्याचे पहायला मिळत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जंग जंग पछाडत असतानाच निवडणुकीच्या आदल्याच दिवशी एक मोठा ट्विस्ट आला आहे.

सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रसचे मंत्री नवाब मलिक आणि आमदार अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी नाकारल्यामुळे आता या निवडणुकीसाठी दोन मतं कमी झाली आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी अपेक्षित मतांचा कोटाही आता कमी झाला आहे. यामुळे आता निवडणुकीतील फायद्या तोट्याची गणितं बदलली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बदललेल्या गणितामुळे कोणाचं पारडं जड होणार, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

(हेही वाचाः मलिक-देशमुखांची मते गेली वाया, न्यायालयाच्या निकालामुळे राज्यसभा निवडणुकीत मविआला धक्का)

कोटा झाला कमी

राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांना राज्य विधानसभेतील सर्व आमदार मतदान करतात. महाराष्ट्र विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या ही 288 इतकी आहे. पण शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे ही संख्या 287 झाली होती. यानुसार राज्यसभेच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी लागणा-या मतांचा कोटा हा 42 इतका होता. पण आता अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची मत बाद झाल्यामुळे हा कोटा 41 झाला आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्षाकडे असलेल्या शिल्लक मतांमध्ये वाढ होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे याचा फायदा नेमका काणाला होणार,हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

(हेही वाचाः भाजप विधानपरिषदेसाठीही आक्रमक, सहाव्या जागेसाठी सदाभाऊंना पाठिंबा)

कसे आहे गणित?

शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार आणि भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यामध्ये राज्यसभेची ही लढाई रंगणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे २६ अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना १६ मतांची गरज आहे. तर भाजपकडे २२ अतिरिक्त मते असून, अन्य ७ आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. अशी एकूण २९ मते त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजपला आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी १३ मतांची गरज आहे. पण आता मतांचा कोटा कमी झाल्यामुळे याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

(हेही वाचाः ‘होय माझे वडील अयोध्येला गेले होते, पण…’ उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा भाजप आमदाराने घेतला समाचार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.