उत्तर भारतीयांची ‘कृपा’ भाजपवर होणार का?

कृपाशंकर सिंह यांच्यामुळे भाजपवर उत्तर भारतीयांची कृपा होणार का?

107

राज्यासह मुंबईत कोरोनाचे संकट असले तरी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसने आधीच स्वबळाची भाषा करत राजकीय वातावरण तापवायला सुरुवात केली असताना, आता भाजपने काँग्रेसचे माजी नेते व माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांना गळाला लावत, त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आहे. त्यामुळे उत्तर भारतीय नेते म्हणून ओळख असलेल्या कृपाशंकर सिंह यांच्यामुळे भाजपवर उत्तर भारतीयांची कृपा होणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

म्हणून कृपांची भाजपमध्ये एन्ट्री

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर भाजपचा एकमेव अजेंडा आहे तो म्हणजे शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका सेनेच्या हातातून हिरावून घेण्याची. त्याचमुळे आता भाजपने सर्व मतदारांवर लक्ष केंद्रित केले असून, मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षात घेता कृपा यांना आता भाजप मैदानात उतरवणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत कृपा शंकर सिंह यांच्या खांद्यावर उत्तर भारतीय मतदारांची जबाबदारी दिली जाणार असून, येत्या काही दिवसांत उत्तर भारतीयांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये सुमारे 40 ते 50 लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. उत्तर भारतीयांच्या मतांची टक्केवारी 20 ते 25 टक्के आहे. मुंबईतील अनेक मतदारसंघांत उत्तर भारतीयांची मते निर्णायकही ठरत आहेत. या उत्तर भारतीय मतदारांमध्ये कृपाशंकर सिंह यांची लोकप्रियता आहे.

(हेही वाचाः महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह यांचा भाजपप्रवेश!)

कोण आहेत कृपा शंकर सिंह?

काँग्रेसच्या काळात 2004 साली कृपाशंकर सिंह हे राज्यमंत्री होते. 2009 साली विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला चांगले यश मिळाले होते, त्याचे श्रेय कृपाशंकर सिंह यांना जाते. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद, आमदार, राज्यमंत्री, अशी पदं काँग्रेसमध्ये कृपाशंकर सिंह यांनी भूषवली आहेत.

भाजपला विस्ताराची संधी

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असल्याने भारतीय जनता पक्षाला आता राज्यामध्ये विस्ताराची मोठी संधी असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. राज्यात सत्तेत भारतीय जनता पक्ष नसला तरी राज्यभरातून भारतीय जनता पक्षात लोक येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

(हेही वाचाः मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी केंद्रात मंत्र्यांच्या राजीनाम्यांना सुरुवात! यांनी दिले राजीनामे)

काय म्हणाले कृपाशंकर?

370 कलम हटवण्याच्या मुद्द्यावर काँग्रेससोबत मतभेद झाल्यामुळे आपण काँग्रेस पक्ष दोन वर्षांपूर्वी सोडला होता. मात्र गेली दोन वर्षे आपण कोणत्याही पक्षाशी जोडले गेलो नव्हतो. 370 कलम पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी काश्मीरमधून हटवल्यानंतर त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली होती आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचा निर्णय मी घेतला असल्याचे कृपाशंकर सिंह यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी सांगितले. काही महिन्यांनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये मुंबईतील उत्तर भारतीय समाज पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या मागे उभा राहील, असा विश्वासही कृपाशंकर सिंह यांनी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.