केंद्रीय मंत्री असलेल्या राणेंना अटक होऊ शकते का? काय म्हणतो कायदा?

नारायण राणेंच्या विरोधात पोलिसांनी भादंवि नुसार कलम ५००, ५०५ (२), १५३ (ब) (१) आणि (क) ही कलमे लावण्यात आली आहेत. एखाद्याची बदनामी करणे, समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणे असे या कलमांचे स्वरूप आहे. 

170
मुखयमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिक, पुणे आणि रायगड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नाशिक पोलिसांनी राणेंना अटक करण्याचा निर्णय घेतला असून त्यांचे पथक चिपळूण येथे रवाना झाले आहे. मात्र राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना मंत्री पदाचे संरक्षण आहे. त्यांना अटक होऊ शकते का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. त्याविषयी कायदे तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे कि, राणे यांना अटक होऊ शकते, मात्र ते अटकपूर्व जमीनही घेऊन अटक टाळू शकतात. नारायण राणेंच्या विरोधात पोलिसांनी भादंवि नुसार कलम ५००, ५०५ (२), १५३ (ब) (१) आणि (क) ही कलमे लावण्यात आली आहेत. एखाद्याची बदनामी करणे, समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणे असे या कलमांचे स्वरूप आहे.

कलम ५०० का चुकीचे आहे? 

पोलिसांनी नारायण राणेंविरोधात लावलेल्या कलमांपैकी कलम ५०० हे चुकीचे लावण्यात आले आहे. कारण ज्या व्यक्तीची बदनामी होते, तिनेच त्या विरोधात तक्रार करणे अपेक्षित असते, इथे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तक्रार केली तर हे कलम लागू शकते. कारण यासाठी राजकीय पक्ष म्हणून याला वेगळा प्रवर्ग म्हणून गृहीत धरता येत नाही. ज्यांची बदनामी झाली ते उद्धव ठाकरे स्वतः अस्तित्वात असल्याने त्यांनी स्वतः तक्रार केली पाहिजे, असे कायदेतज्ज्ञ असीम सरोदे ‘हिंदुस्थान पोस्ट’ शी बोलताना म्हणाले. असाच प्रकार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या बाबतीतही झाला  होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी  सोनिया गांधी आणि सीताराम केसरी यांच्या संबंधी अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यावेळीही केस दाखल झाली होती, मात्र तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते कि, बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कोणत्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्याने तक्रार केल्यामुळे कारवाई करता येणार नाही. कारण तक्रार स्वतः सोनिया गांधी यांनी करावी. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेण्यात आला होता. मदर तेरेसा यांच्याविरोधातही अवमानकारक वक्तव्य करण्यात आले होते, त्यावेळी काही ख्रिश्चन नागरिकांनी यावर तक्रार केली होती, तेव्हा न्यायालयाने मदर तेरेसा अस्तित्वात आहेत, त्यांनी स्वतः तक्रार करणे अपेक्षित आहे, अन्य कुणीही करू शकत नाही. त्यामुळे इथेही राणेंच्या विरोधात स्वतः उद्धव ठाकरे यांनी तक्रार करणे अपेक्षित आहे, म्हणून कलम ५०० हे पूर्णतः चुकीचे आहे, पोलिसांनी सुरुवातीला हे कलम लावले आहे. पोलिसांना त्यांची ही चूक लक्षात आल्यावर ते हे चुकीचे कलम त्यांच्या अंतिम अहवालातून काढू शकतात किंबहुना आतापर्यंत ते काढलेही असेल, असेही वकील सरोदे म्हणाले.

म्हणून पोलिस कुणाच्याही परवानगीशिवाय करू शकतात अटक! 

५०३, १५३ (बी) या कलामांच्या अंतर्गत राणेंना ३-५ वर्षे कारावास होऊ शकतो. ही कलमे बरोबर आहेत. राणेंनी केलेल्या वक्तव्यावर या कलमानुसार कारवाई होऊ शकते. त्याआधी पोलिसांना नारायण राणेंना सीआरपीसी ऍक्ट ४१ अंतर्गत नोटीस पाठवावी लागेल. ती कराणेदाखवा नोटीस असते. तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून तुम्हाला अटक का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करावी लागेल. मात्र याचे उत्तर येवो कि न येवो पोलिस अटकेची कारवाई करू शकतात, असेही वकील सरोदे म्हणाले.
1120

राणे हे केंद्रीयमंत्री असल्याने अटक होऊ शकते का? 

मंत्रिपदाच्या जबाबदारी अंतर्गत जर काही चुका झाल्या असतील तर त्यांनी ते सद्भावनेने केले आहे, असे गृहीत धरून त्यांना संरक्षण दिले जाऊ शकते. पण राणेंनी केलेले बेताल आणि असभ्य वक्तव्य हा त्यांच्या मंत्रिपदाच्या जबाबदारीचा भाग नव्हता. त्यामुळे पोलिसांना अटकेची कारवाई करताना कुणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. राणेंना पोलिस अटक करू शकतात. केंद्र सरकारलाही पूर्व कल्पना देण्याची गरज नाही. जन आशीर्वाद यात्रा हा त्यांच्या मंत्रिपदाच्या कामकाजाचा भाग नाही, असेही सरोदे म्हणाले.

अटकपूर्व जामीन मिळू शकतो!

हा दखलपात्र गुन्हा असला तरी यात अटकपूर्व जामीन मिळू शकतो. त्यासाठी राणे प्रयत्न करू शकतात, पोलिस येईपर्यंत ते जामीन मिळवू शकतात. अटक थांबवू शकतात. तसेच त्यांना पोलिसांनी लावलेल्या कलम ५०० या चुकीच्या कलमाचा फायदा घेता येऊ शकेल, कारण जेव्हा एखादे कलम चुकीचे लावले असेल तर आपसूकच इतर सर्व कलमांवर शंका घेता येते, त्याचा फायदा संबंधितांना मिळतो, असेही वकील सरोदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.