उध्दव ठाकरे यांच्या शक्तीप्रदर्शनात इच्छुकांची चेहरापट्टी

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शासकीय वर्षा निवासस्थान सोडून संध्याकाळी मातोश्री निवासस्थानावर मुक्काम हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे स्वागत तसेच पाठिंबा दर्शवण्यासाठी वांद्रे येथील मातोश्री निवासस्थाना बाहेर शिवसैनिकांनी जोरदार गर्दी केली. मुंबईतील अनेक भागांमधून शिवसैनिक मातोश्री निवासस्थानी जमू लागले. परंतु याठिकाणी जमा होत आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले शक्तीप्रदर्शन आणि चेहरापट्टीही करून घेतले.

तुमचे प्रेम असेच ठेवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भावनिक आवाहन करत फुटलेल्या आमदारांनी मला सांगावे, मी पद सोडायला तयार आहे. माझी आयुष्याची कमाई पदे नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोलतो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. हीच माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या हा विषय गौण आहे. संख्या कशी जमवता हे नगण्य आहे. मी त्यांना आपला मानतो, त्यांनी मला सांगाव, मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असेच ठेवा,असे आवाहन करत उध्दव ठाकरे यांनी आजच वर्षावरील मुक्काम मातोश्रीत हलवतोय,असे जाहीर केले.

( हेही वाचा : पावसा…पावसा ये रे, पाणीकपात नको रे; पाणी साठ्याची पातळी दहा टक्क्यांच्या खाली)

त्यानंतर वर्षावरून रात्री उशिरा मुख्यमंत्री मातोश्रीवर जाण्यासाठी निघाले. त्याठिकाणी वर्षावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावत त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तर वर्षाच्या बाहेरील बाजुस दक्षिण मुंबईतील शिवसैनिकांन गर्दी केली होती, तसेच मातोश्रीपर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी शिवसैनिक भगवे ध्वज घेऊन स्वागतासाठी उभे होते, तसेच मातोश्रीबाहेरही शिवसैनिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. मात्र, ही गर्दी म्हणजे आगामी निवडणुकीतील इच्छुकांची चेहरापटी असल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकीत उमेदवारी स्वत:च्या खिशात घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसह याठिकाणी गर्दी केल्याचे बोलले जात आहे. इच्छुकांनाही शक्तीप्रदर्शन करण्याची ही सुवर्ण संधी चालून आल्याने मोठ्याप्रमाणात शिवसैनिकही जमले असल्याचेही बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here