राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे. (Gram Panchayat Elections)
राज्यातील २ हजार ३५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच थेट सरपंचपदाच्या १३० रिक्त जागा व २ हजार ९५० सदस्यपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांचा निकाल ६ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे विनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी ६ डिसेंबर २०२३ पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे. (Gram Panchayat Elections)
(हेही वाचा – Prasad Kulkarni : कोरोनाकाळात अनेकांचे प्राण वाचवणारे सामाजिक कार्यकर्ते ‘प्रसादिती इक्विपमेंटस्’चे प्रसाद कुलकर्णी यांचे निधन)
नक्षलग्रस्त/दुर्गम भागात मात्र ७ नोव्हेंबर २०२३ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे तेथील बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी ७ डिसेंबर २०२३ पर्यंत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे. या खर्चाचा हिशेब राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू व्होटर ॲपद्वारेच सादर करणे बंधनकारक आहे, परंतु पोटनिवडणुकांत बिनविरोध विजयी झालेल्यांसह सर्व उमेदवारांना खर्चाचा हिशेब पारंपरिक पद्धतीने सादर करता येईल, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे. (Gram Panchayat Elections)
Join Our WhatsApp Community