मुंबईतील मतदान केंद्र ५० टक्क्यांनी वाढणार! निवडणूक विभागाच्यावतीने सर्वेला सुरुवात

मतदान केंद्र आणि निवडणूक कामासाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यावर भर दिला जाणार असून, त्यासाठीची प्रक्रिया सर्वप्रथम हाती घेतली जात आहे.

मुंबई महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक नियोजित वेळेवर होईल की पुढे ढकलली जाईल, याबाबतच्या शक्यता वर्तवल्या जात असतानाच दुसरीकडे महापालिका निवडणूक विभाग कामाला लागला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत यापूर्वी महापालिका निवडणुकीकरता वापर करण्यात आलेल्या मतदान केंद्रांचा सर्वे करण्यात येत आहे. कोविडमुळे मतदान केंद्रात मतदारांची संख्या कमी करुन, अधिक मतदान केंद्रं तयार करावी लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा सर्वे असून, या अंतर्गत विद्यमान मतदान केंद्रांव्यतिरिक्त अधिक ५० टक्के केंद्र वाढवण्यात येणार आहेत.

निवडणूक कधी होणार?

मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित मानली जात आहे. परंतु कोविडची संभाव्य तिसरी लाट आणि त्यानंतर निर्माण झालेला ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका निवडणूक विभागाला हिरवा झेंडा दाखवून, कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे सर्वप्रथम मतदान केंद्र आणि निवडणूक कामासाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यावर भर दिला जाणार असून, त्यासाठीची प्रक्रिया सर्वप्रथम हाती घेतली जात आहे.

(हेही वाचाः महापालिका निवडणुका मतपत्रिकांवर होणार?)

म्हणून मतदान केंद्र वाढवण्याची गरज

या निवडणुकीत ४५ प्रभाग असे आहेत, ज्यांच्या प्रभाग रचनेत त्रुटी असून त्यात सुधारणा करण्याची मागणी काँग्रेस पक्षाची आहे. त्यानुसार एका बाजूला प्रभागांची सुधारणा करण्याचे काम हाती घेतले जाणार असून, दुसऱ्या बाजूला मतदान केंद्रांची रचना तयार करणे, या दोन्ही बाबींची कामे एकाच वेळी हाती घेतली जाणार आहे. एक मतदान केंद्र हे सुमारे १२०० मतदारांचे असते. परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग राखणे आणि कमीत कमी गर्दी होईल अशी व्यवस्था राखणे बंधनकारक आहे. त्यामुळे मतदान केंद्रात सुमारे ७०० ते ८०० मतदार असणे आवश्यक आहे. म्हणूनच मतदार केंद्रांची संख्या वाढवणे आवश्यक आहे.

(हेही वाचाः महापालिका निवडणूक जवळ येताच शिवसेनेला आठवला ‘मराठी’ माणूस)

महापालिका निवडणूक विभागाला विद्यमान मतदान केंद्राव्यतिरिक्त ५० टक्के अधिक केंद्र बनवणे आवश्यक आहेत. त्या दृष्टीकोनातून महापालिका निवडणूक विभागाने विद्यमान मतदान केंद्राचा सर्वे करतानाच अधिक मतदान केंद्राचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यमान मतदान केंद्राच्या जागा किती उपलब्ध होतात आणि अतिरिक्त मतदान केंद्र कुठून निर्माण होतील, याचा अंदाज या सर्वेतून प्राप्त करण्याचा प्रयत्न निवडणूक विभागाने सुरू केला असल्याची माहिती मिळत आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here