आमदार नसतानाही वारिस पठाण मिरवताहेत ‘आमदारकीची शेखी’; गाडीवर अशोकस्तंभासह लोगो कायम

105

२०१९ च्या निवडणुकीत भायखळा विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतरही ‘एमआयएम’चे नेते वारिस पठाण आमदारकीची शेखी मिरवत असल्याचे समोर आले आहे. पठाण वापरत असलेल्या चारचाकी वाहनावर अद्याप ‘आमदार’ (अशोकस्तंभासह) असा लोगो कायम असून, गेल्या अडीच वर्षांत पोलिसांकडून त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

( हेही वाचा : देवनारमधील कचऱ्यापासून वीज निर्मिती : प्रत्यक्षात प्रकल्प सुरु व्हायला २०२४ उजाडणार)

‘हिंदुस्थान पोस्ट’ने व्हिडिओ चित्रिकरण करून हा प्रकार उघडकीस आणला आहे. एमएच-०२-डीएन-४५०० ही फॉर्च्युनर कार वारिस पठाण यांच्या पत्नी ‘गझला वारिस अली पठाण’ यांच्या नावावर आहे. अंधेरी वाहतूक विभागात नोंदणीकृत असलेली ही गाडी सध्या वारिस पठाण वापरतात. गाडीच्या मागच्या बाजूला आमदार असा लोगो लावण्यात आला आहे. त्यावर अशोकस्तंभही आहे. निर्वाचन अधिकाऱ्याने आमदार असल्याचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय खासगी वा प्रशासकीय बाबीवर ‘आमदार’ असा उल्लेख करता येत नाही. परंतु, वारिस पठाण यांनी या नियमाचा भंग करीत बेकायदेशीरपणे वाहनावर आमदार असा उल्लेख केल्याचे ‘हिंदुस्थान पोस्ट’ने चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. राज्यात असा लोगो फक्त विधिमंडळ सदस्य वापरतात.

काळ्या काचांकडेही दुर्लक्ष

केवळ आमदार असा उल्लेख करून न थांबता वारिस पठाण यांनी गाडीत बेकायदेशीरपणे काळ्या रंगाच्या काचा बसविल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मोटारींना काळ्या काचा लावण्यावर बंदी घातली आहे. गाडीत कोण बसले आहे, याचा अंदाज बाहेरून यावा यासाठी ५० ते ७० टक्के व्हिजन असलेल्या फिल्म लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनेकजण वाहनांना १०० टक्के काळ्या फिल्म लावतात. त्यामुळे बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांच्या चौकशीत अडथळे निर्माण होतात. सुरक्षेच्या कारणास्तव काळ्या काचा असलेल्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियमाच्या कलम १०० (२) अन्वये कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. असे असताना वारिस पठाण यांच्या वाहनांवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वारिस पठाणांकडून सारवासारव

‘मी गाडीवर माजी आमदार असा उल्लेख केलेला आहे. आम्ही कायद्याने चालणारी माणसे आहोत. राज्यात असे अनेक माजी मंत्री आहेत जे आजही आपल्या गाड्यांवर मंत्रीपदाची पाटी लावून फिरतात. अनेकांनी अद्याप शासकीय बंगला सोडलेला नाही. त्याचीही चौकशी करा’, अशी प्रतिक्रिया वारिस पठाण यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना दिली.

…तर कारवाई करणार

वाहनाच्या काचेवर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींव्यतिरिक्त काळ्या फिल्म लावणे मोटार वाहन कायद्यानुसार नियमबाह्य आहे. असे कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून काळी फिल्म काढली जाते. तसेच लोकप्रतिनिधी नसणाऱ्या व्यक्तींच्या वाहनाला लोकप्रतिनिधी असल्याचे स्टिकर लावलेले असेल तर कायद्याने गुन्हा आहे, असे कोणीही आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते अशी माहिती मुंबई वाहतूक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.