‘त्या’ प्रकरणात शिवसेनेचे आमदार सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल; फडणवीसांची विधान परिषदेत माहिती

127

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार सदा सरवणकरांवर शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच शस्त्र दुसऱ्याला देण्यात आल्यामुळे सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत दिली. यामुळे आता सदा सरवणकर यांच्याकडील असलेला शस्त्र परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू झाली आहे.

विधान परिषदेत फडणवीस काय म्हणाले?

माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात लोकप्रतिनिधी आणि खासगी व्यक्तींकडून झालेला गोळीबार हा विषय आपण मांडला होता. ज्यामध्ये आपण सदा सरवणकर यांचा विषय मांडला होता. या नमूद गुन्ह्यामध्ये १४ साक्षीदार तपासले. या प्रकरणात सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर असे एकूण ११ आरोपींना कलम ४१ अ अन्वये नोटीस देण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांचे जे परवाना असलेले पिस्तूल आहे ते त्यांनी स्वत: सोबत बाळगणे आवश्यक असताना त्यांनी ते गाडीत ठेवले. असे ते ठेवता येत नाही. त्यामुळे आर्म्स अॅक्ट १९६९चे कलम ३० अन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी परवाना आणि शर्थी नियमांचे उल्लंघन केले असल्याने त्यांना जो काही शस्त्र परवाना दिलाय तो रद्द करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

काय होते प्रकरण?

२०२२मध्ये गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. प्रभादेवी या ठिकाणी गणेश विसर्जनावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले, त्यानंतर संघर्ष टळला. परंतु हा वाद पुन्हा उफाळून आला. सदा सरवणकर समर्थकांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या समर्थकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला होता.

(हेही वाचा – वीर सावरकरांवरील विधानावरून मुख्यमंत्री संतापले; म्हणाले, राहुल गांधींना अर्धा-एक तासासाठी कोलूवर जुंपलं पाहिजे म्हणजे…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.