मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरे प्रकरणात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

169

मराठा क्रांती मोर्चाचे नेते रमेश केरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ८ जणांवर मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश केरे यांच्यावर सर, जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

( हेही वाचा : भाजप बेस्ट कामगार संघाचा वेतन करार पूर्ण; अनेक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय)

औरंगाबाद येथील गारखेडा येथे राहणारे मराठा क्रांती मोर्चाचे नेते रमेश केरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या पी. डिमेलो रोड येथील एका हॉटेलच्या खोलीत फेसबुक लाईव्ह करीत उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना तातडीने उपचारासाठी सर जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताच माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्याकडे चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला असता त्यांनी आपल्या जबाबात असे म्हटले आहे की, समाजात माझी फार बदनामी झाली आहे मला जगायचे नाही, मला आत्महत्येस प्रवृत्त करणारे विवेकानंद बाबर, अनिरूध्द शिवाजी शेलार, योगेश केदार, संदिप पोळ, बाळासाहेब सराटे, विशाल पवार, नितीन कदम, प्रदिप कणसे व इतर इसमांनी मी मराठी आरक्षण संदर्भात झालेल्या मोर्चात पैसे खाल्ले नसताना तसे खोटे नाटे आरोप करून मी मराठा समाजाशी बेईमानी केली अशी ऑडिओ क्लिप व संदेश सोशल मीडियावर व्हायरल करून माझी बदनामी केली. मराठा समाजाशी मी अशी बेईमानी केल्यामुळे मी मरायला पाहिजे असे बोलून मला मानसिक त्रास दिला. व त्या त्रासाला कंटाळून मी जीवन संपवायचे हा विचार करून उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असे केरे यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

या प्रकरणी एम आर ए मार्ग पोलिसांनी ८ जणांविरुद्ध धमकी देणे, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.