पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकवण्यात आल्याची घटना घडली. उद्यान उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होता. या दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या दरम्यान जेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ताफा दाखल झाला त्या गोंधळात एका अज्ञात व्यक्तीने चप्पल फेकली. या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलम 336 प्रमाणे हा गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या कार्यकर्त्यांचा शोध सुरू केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चप्पल फेक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर चिखली पोलिसात दखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. कलम 336 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आल्याने लवकरच त्याला ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर होते, त्यासाठी फडणवीसांसह राज्यभरातील अनेक नेते मंडळीही पुण्यात दाखल झाले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.
(हेही वाचा – ओबीसी आरक्षणावरील विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर)
याप्रकरणी काय म्हणाले फडणवीस…
चप्पल फेकण्याच्या या प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला असून त्यांना फटकारले. चप्पल फेकीच्या घटनेवर असे फालतू लोकं, चिल्लर लोकं असतात. अशा शब्दात फडणवीसांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर टीका केली. स्वतः काही करायचे नाही. त्यांच्या कार्यकाळात ते काहीच करू शकले नाहीत. आमच्या महापौर, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी चांगले काम करून दाखवल्याने त्यांच्या मनामध्ये असूया आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.