बडतर्फ पोलीस अधिकारी वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. मुंबई पोलीस दलात अनेक वाझे आजही वावरत आहेत. जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांवर एका हिरे व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.
( हेही वाचा : मुंबई विमानतळावरील धावपट्टी १८ ऑक्टोबरला एवढा वेळ बंद राहणार)
मागील दोन वर्षांत मुंबई पोलीस दलातील पोलिसांवर खंडणीचे गुन्हे दाखल होण्याची पाचवी घटना आहे. खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा सर्रास प्रकार मुंबईतच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यामधील पोलीस दलात सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सुनील कमलाकर वर्तक (५७) आणि विजय गायकवाड असे खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत. मुंबईच्या जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात सुनील वर्तक हे सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर होते, तर गायकवाड पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. १५ ऑक्टोबर रोजी हे दोघे जे. जे. जंक्शन या ठिकाणी कर्तव्यावर असताना त्यांनी गिरगाव येथे राहणाऱ्या हिरे व्यापारी हितेंद्र पटेल आणि त्यांचा चुलत भाऊ प्रतीक पटेल यांना बळजबरीने अडवले, व दोघांवर पोलीस कारवाई करण्याची भीती दाखवून त्यांच्याजवळील १० हजार रुपये बळजबरीने काढून घेतले.
त्यांच्यासोबत झालेला प्रकार हितेंद्र पटेल यांनी ट्विटर या समाजमाध्यमातून समोर आणला, या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन हितेंद्र पटेल यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची तक्रार लिहून घेत सुनील वर्तक आणि विजय गायकवाड यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
यापूर्वी मुंबईतील गुन्हे शाखेच्या तीन अधिकाऱ्यांवर एका बांधकाम व्यवसायिकांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती, त्यात एका महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान चेंबूर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मासह निलंबित पोलीस अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्यावर अंगाडीयाच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता, त्यात तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती तर पोलीस उपायुक्तांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मुंब्रा पोलीस ठाण्यातील ७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ३० कोटींच्या प्रकरणात निलंबित करण्यात आलेले असून त्यांच्यावर खंडणीचा ठपका ठेवून विभागीय चौकशी लावण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community