सीबीआय प्रमुख बदलून केंद्राने टाकली ‘गुगली’… ठाकरे सरकार होणार ‘क्लिन बोल्ड’?

राज्य सरकारबरोबर पटत नसल्याने ‘त्यांनी’ पुन्हा एकदा केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता ते केंद्रात गेल्याने ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्त आहे.

95

केंद्र सरकार आणि ठाकरे सरकार यांच्यामधील वाद मागील वर्षभरापासून जोरदार रंगला असून, आता केंद्राने टाकलेल्या एका गुगलीने ठाकरे सरकारची भविष्यात विकेट जाण्याची शक्यता आहे. आधीच राज्य सरकार आणि त्यांचे नेते सीबीआय तसेच इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असताना, ठाकरे सरकारवर नाराज असलेल्या सुबोध कुमार जयस्वाल यांची देशातील अत्यंत महत्वाची तपास यंत्रणा म्हणून ओळखली जाणा-या केंद्रीय गुन्हे अन्वेषण(सीबीआय)च्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे आता राज्य सरकार समोरील अडचणी भविष्यात वाढण्याची चिन्हे सर्वाधिक आहेत.

अनिल देशमुख तपास सीबीआयकडे

माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे चर्चेत असेलेल्या शंभर कोटी वसुली प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सीबीआयच्या रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणात सीबीआयने वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा देखील जबाब नोंदवला. तसेच सीबीआय शुक्ला यांना साक्षीदार करणार आहे. त्यातच आता सुबोध कुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या प्रमुखपदी निवड झाल्याने, अनिल देशमुख यांची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जात आहे. सीबीआयने याआधी अनिल देशमुख, त्यांचे दोन पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचे जबाब नोंदवले आहेत, तर निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे आणि त्याच्या दोन वाहन चालकांसह अनेकांचे जबाब रेकॉर्ड करण्यात आले आहेत.

(हेही वाचाः अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयची धाड! लॅपटॉप, फाईल्स ताब्यात घेतल्या! )

राज्य सरकारचा युक्तिवाद

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी प्राथमिक चौकशी केल्यानंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये, सीबीआयने अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. ज्याद्वारे राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात मांडण्यात आला आहे.

परिवहन विभागातील बदल्यांचेही कागद सीबीआयच्या हातात?

काही दिवसांपूर्वी परिवहन विभागात बदल्यांचे घोटाळ्यांवर घोटाळे झाल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी थेट राज्यपाल आणि सीबीआयकडे केली होती. परिवहन विभागातही एक सचिन वाझे असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. सचिन वाझे हा बडे अधिकारी, काही सत्ताधा-यांसाठी खंडणी वसुलीचे काम करत होता. त्याच धर्तीवर बजरंग खरमाटे हा परिवहन विभागातील सचिन वाझे असल्याचा चिमटा किरीट सोमय्या यांनी काढला. तसेच सोमय्या यांनी असा दावा केला होता की, परिवहन विभागातील बदली रॅकेट बाबत त्यांच्याकडे एक तक्रार आलेली आहे. बदल्यांचे रेट २५ लाख, ५० लाख, एक कोटी की, आणखी किती? याबाबतची माहिती त्यात आहे. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, यासाठी त्यांनी राज्यपाल व सीबीआयकडे मागणी केली होती. सोमय्या यांच्या या मागणीवर सीबीआयने चौकशी सुरू केली असून, याचीही काही कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अनिल परब देखील देशमुखांप्रमाणेच रडारवर येतील, असे म्हटले जात आहे. त्यातच आता जयस्वाल हे सीबीआयचे प्रमुख झाल्याने, मातोश्रीच्या जवळ असलेल्या अनिल परबांची देखील डोकेदुखी भविष्यात वाढणार आहे.

(हेही वाचाः आता शिवसेनेचे अनिल अडचणीत… मंत्रिमंडळातून हाकलण्याची मागणी)

म्हणून जयस्वालांना सीबीआय प्रमुखपदी आणले का?

महत्त्वाचे म्हणजे सुबोध कुमार जयस्वाल हे याआधी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक आणि मुंबईचे पोलिस आयुक्त होते. यामुळे त्यांना महाराष्ट्रातील पोलिस खात्याची इत्यंभूत माहिती आहे. याशिवाय महाराष्ट्रातील राजकीय स्थितीची आणि नेते मंडळींनाही ते जाणून आहेत. त्यातच राज्यातील काही महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास सध्या सीबीआय करत असल्यानेच त्यांची सीबीआयच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली तर नाही ना?, अशी शक्यता देखील आता उपस्थित होऊ लागली आहे. तसेच केंद्र आता जयस्वाल यांच्या माध्यमातून आपला हेतू तर साध्य करणार नाही ना?, अशी चिंता देखील आता ठाकरे सरकारमधील काही नेत्यांना लागली आहे.

सुबोध कुमार जयस्वाल आणि सरकार यांच्यात आधीपासूनच वाद

सुबोध कुमार जयस्वाल हे केंद्र सरकारमध्ये होते, त्यानंतर ते मुंबईत आले. तीन वर्षांपूर्वी ते मुंबईचे पोलिस आयुक्त होते. त्यानंतर त्यांना बढती मिळाली आणि ते राज्याचे पोलिस महासंचालक झाले. सरकार आणि सुबोध कुमार जयस्वाल यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या बदल्या झाल्या होत्या. त्या बदल्या मी होऊ देणार नसल्याचा त्यांनी पवित्रा घेतला. राज्य सरकारबरोबर पटत नसल्याने पुन्हा एकदा त्यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता ते केंद्रात गेल्याने ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्त आहे.

(हेही वाचाः सीबीआय प्रमुखपदी सुबोध कुमार जयस्वाल! )

कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल?

मुंबईचे पोलिस आयुक्त आणि महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक पद भूषवल्यानंतर जयस्वाल हे केंद्राच्या सेवेत रुजू झाले होते. सुबोध कुमार जयस्वाल यांनी ९ वर्षे देशाच्या गुप्तचर विभागाचे काम बघितले आहे. सीबीआयच्या प्रमुख पदाचे सुबोध कुमार जयस्वाल हे तिसरे दावेदार होते. १९८५च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सुबोध कुमार जयस्वाल हे दोन वर्षांनंतर सेवानिवृत्त होत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.