महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेले अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून बदलण्यात येत आहेत. त्यातच आता राज्यात सीबीआयवर असलेली बंदी हटवण्याचा निर्णय देखील राज्य सरकार घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज्यात आता सीबीआय तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच यावर महाराष्ट्र सरकारकडून निर्णय घेण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लवकरच निर्णय होणार
राज्य सरकारच्या परवानगीशिवाय राज्यात सीबीआयला तपास करण्यावर महाविकास आघाडी सराकरडून बंदी घालण्यात आली होती. पण आता मात्र शिंदे-फडणवीस सरकारकडून सीबीआयला कोणत्याही परवानगीशिवाय तपास करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच मंत्रिमंडळात याबाबतचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः गैर काश्मिरींना मतदानाचा अधिकार दिल्याने दहशतवादी संघटनांचा हल्ले तीव्र करण्याचा इशारा)
महाविकास आघाडी सरकारचा निर्णय
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण,टीआरपी घोटाळा यांसारख्या अनेक गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे जाण्याची शक्यता असल्यामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सीबीआयवर बंधने घालण्याचा निर्णय घेतला होता. पण आता ही बंधने उठवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सीबीआयवरील बंदीमुळे राज्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास हा ईडीकडून करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community