पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’चे राजकारण! संजय राऊत यांचा आरोप 

'नारदा' स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजपच्या शुभेंदु अधिकारी, मुकुल रॉय यांचीही नावे आहेत, मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रकारे सीबीआयने कारवाई केली आहे, ही अन्यायकारक आहे. ही कारवाई पक्ष बघून करण्यात येत आहे. खरे तर ही कारवाई ज्या प्रकारे तृणमूल काँग्रेसच्या २ मंत्र्यांवर होत आहे, त्याप्रमाणे भाजपाच्याही नेत्यांवर केली पाहिजे, कारण त्यांचेही नेते यात दोषी दिसत आहेत, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातही सीबीआयचे राजकारण!

ज्या ‘नारदा’ स्टिंग ऑपरेशनमुळे सीबीआयची ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये सीबीआयने सोमवारी ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री फिरहाद हाकीम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर शोवन चॅटर्जी यांना अटक केली आहे, त्यामध्ये भाजपच्याही नेत्यांची नावे आहेत. त्यात शुभेंदु अधिकारी, मुकुल रॉय यांची नावे आहेत, मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. सीबीआयचे राजकारण सर्वत्र केले जात आहे, महाराष्ट्रातही झाले आणि होत आहे, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा : बंगालमध्ये ममता दिदी विरुद्ध सीबीआय वाद पेटला! दिदींचा सीबीआय कार्यालयात ठिय्या)

कायद्याचा सामान वापर व्हावा!

कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे, त्याचा पक्ष पाहून उपयोग करता कामा नये. पश्चिम बंगालमध्ये त्याचा वापर पक्ष पाहून होत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्या ठिकाणी सीबीआयच्या कार्यालयात ठिय्या मांडला आहे. सीबीआयने त्यांच्या २ मंत्री आणि १ आमदाराला ताब्यात घेतले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

काय आहे नारदा घोटाळा?

पश्चिम बंगालमधील 2016च्या विधानसभा निवडणुकांआधी नारदा घोटाळ्याच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ, समोर आला होता. तृणमूल काँग्रेसचे नेते एका काल्पनिक कंपनीकडून रोख रक्कम घेताना या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. नारदा न्यूज पोर्टलच्या मॅथ्यू सॅम्युअल यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. या चौकशीत अनेक नेत्यांची नावे समोर आली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here