अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयची धाड! लॅपटॉप, फाईल्स ताब्यात घेतल्या! 

परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर अडचणीत आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयकडून लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर काही तासांतच दिल्लीहून सीबीआयचे पथक थेट अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील निवासस्थानी धडकले आणि तिथे छापेमारी केली.

देशमुखांचा लॅपटॉप सीबीआयने घेतला! 

सीबीआयच्या पथकाने संध्याकाळपर्यंत अनिल देशमुख यांच्या निवासस्थानाची तपासणी केली. नागपूर व्यतिरिक्त मुंबईतही कारवाई सुरु होती. संध्याकाळी चौकशी संपल्यावर पथकाने देशमुख यांचा लॅपटॉप आणि काही फाईल्स सोबत नेल्या. त्यानंतर देशमुख यांनी माध्यमांसमोर येऊन मी आणि माझ्या कुटुंबाने सीबीआयला चौकशीत सहकार्य केले, अशी थोडक्यात प्रतिक्रिया दिली.

पीपीई किट घालून आले पथक! 

अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी पीपीई किट घालून आले. ते खासगी वाहनाने दिल्लीहून आले होते. याची स्थानिक सीबीआय कार्यालयालाही माहिती नव्हती.

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल

सीबीआयच्या एफआयआरमध्ये अनिल देशमुख यांचे नाव असून इतर 5 जण अनोळखी आरोपी दाखवण्यात आले आहे. हे पाच आरोपी कोण याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी, अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझेला १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भात सीबीआयकडून जोरदार तपास करण्यात येत होता. या तपासादरम्यान सीबीआयकडून अनिल देशमुख यांचीही चौकशी करण्यात आली होती. दरम्यान आता गुन्हा दाखल झाल्यानंतर देशमुखांच्या राज्यभरातील मालमत्तेवर छापेमारी करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः अनिल देशमुखांवरील आरोपांची चौकशी पूर्ण! सीबीआयचे पथक दिल्लीला रवाना! )

सात जणांचा जबाब नोंदवला!

या दरम्यान सीबीआयने तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग, निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे, एसीपी संजय पाटील, याचिकाकर्त्या जयश्री पाटील, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे दोन स्वीय्य सहाय्यक पालांडे आणि कुंदन अशा एकूण सात जणांची यामध्ये चौकशी करण्यात आली होती.

(हेही वाचाः सीबीआयने परमबीर सिंग यांच्यासह चार जणांचे नोंदवले जबाब!)

देशमुखांनी फेटाळले होते आरोप!

अनिल देशमुख यांनी आपल्यावरील बहुतांश आरोप फेटाळले होते. त्यांच्यावर झालेले सर्व आरोप तथ्यहीन आणि चुकीचे असल्याचा दावा देशमुखांनी केला होता. महाराष्ट्राला आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा काही अधिका-यांचा हा प्रयत्न आहे, असेही देशमुख चौकशीदरम्यान म्हणाले होते. यावेळी देशमुखांनी अनेक प्रश्नांना ‘मला माहित नाही, माझा काहीही संबंध नाही’, अशीच उत्तरे दिली. डीसीपी राजू भुजबळ आणि एसीपी संजय पाटील यांनी त्यांच्या जबाबात स्पष्ट केले की, मी त्यांना कोणतीही वसुली करायला सांगितली नाही, मुंबई पोलिसांनी केलेल्या अंतर्गत चौकशीत जी बाब समोर आली, त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य नाही, असे देशमुख यांनी सीबीआय चौकशीत म्हटल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते.

(हेही वाचाः सीबीआय चौकशीत अनिल देशमुखांचे एकच उत्तर ‘मला माहित नाही, माझा काहीही संबंध नाही’!)

अहवाल विधी विभागाला सुपूर्द!

सीबीआयकडून या प्रकरणाचा अहवाल तयार करुन, सीबीआयच्या विधी विभागाकडे हा अहवाल २० एप्रिल रोजी पाठवण्यात आला होता. या अहवालबाबत सीबीआयचे संचालक विधी विभागाशी चर्चा करुन पुढील निर्णय लवकरच घेण्यात येतील, असे सांगण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here